ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई : मराठी सिनेविश्वातील काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचे नाव आजही प्रेक्षक खूप आपुलकीने घेतात. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री आशा काळे. अशा काळे यांनी अनेकवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना २०२३ या वर्षासाठी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा काळे यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
२६ जून रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर पुढील तीन दिवस २८ जून पर्यत विविध कलात्मक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे.
त्यात प्रामुख्याने जादूचे प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा, चांडाळ चौकडीच्या करामती, प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांची मुलाखत, मनिषा लताड प्रस्तूत हिटस् ऑफ लता मंगेशकर व आर. डी. बर्मन संगीत रजनी, पारंपारिक भारूड या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
याशिवाय महिलांसाठी मंगळागौर, फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव, शाहीर दादा कोंडके यांच्या ढंगात ‘दादांची आठवण आली का’, द इन्स्ट्रुमेंटल आर.डी., तसेच चर्चासत्रात थेट भेट नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी सौमित्र पोटे यांनी साधलेला संवाद आणि यावर्षी पहिल्यांदाच मास्टर जयसिंग पाचेगांवकर सह लता-लंका पाचेगांवकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण होणार आहे.