पुण्यातील हल्ल्याचे राजकीय पडसाद! ठाकरे गट आक्रमक, सुषमा अंधारेंच्या मागणीने सरकारची डोकेदुखी वाढणार?


पुणे : पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या आवारात मंदार किवळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. शिवसेना (ठाकरे गटाच्या) नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री देण्याची मागणी केली.

‘गुंडांना कुणाचीही भीती उरली नाही का?’
पुण्यात गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी हत्या, गोळीबार आणि कोयता गँगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पाठबळ कोण देत आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवरही निशाणा साधला. पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींना महापालिका निवडणुकीसाठी तिकिटे देण्यात आल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.

‘गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळतंय’
गुन्हेगारी घटनांमधील आरोपींना राजकीय नेत्यांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर अंधारे यांनी टीका केली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी नेते जात नाहीत; मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी सांत्वनासाठी पोहोचतात, असा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारच्या भूमिकेमुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्या म्हणाल्या. पुणे पोलिसांनी यापूर्वी १४५ कोयते जप्त केले होते, तर पुन्हा कोयते कुठून येतात, असा सवाल करत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘आत्ताच्या गृहमंत्र्यांना इतर कामं फार’
राज्याच्या गृहमंत्र्यांवर टीका करताना अंधारे म्हणाल्या की, सध्या गृहमंत्र्यांकडे इतर अनेक कामे आहेत. राजकीय घडामोडी आणि इतर कार्यक्रमांमध्ये त्यांचा वेळ जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री देण्याची सरकारकडे मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांच्याकडेही केली मागणी
पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनाही सुषमा अंधारे यांनी विशेष विनंती केली. पुण्यातील पोलीस प्रशासनात बदल करण्याची गरज असून पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनात बदल होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!