१ डिसेंबरपासून बदलणार अनेक आर्थिक नियम! गॅस सिलिंडर, क्रेडिट कार्ड अन् कर्जाबाबत महत्त्वाचे बदल; खिशावर होणार परिणाम

पुणे : नोव्हेंबर महिना संपताच डिसेंबरची सुरुवात होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे १ डिसेंबरपासूनही आर्थिक आणि दैनंदिन व्यवहारांशीसंबंधित काही नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये गॅस सिलिंडरचे दर, SBI क्रेडिट कार्डचे नियम, कर्जाचे व्याजदर आणि आधारशी संबंधित सुविधांचा समावेश आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक नियोजनावर होऊ शकतो.
त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोणते बदल होणार आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल

SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी १ डिसेंबरपासून काही व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागू होण्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, एका व्यवहारात ३० हजार रुपयांपेक्षा अधिक ट्रान्सपोर्ट पेमेंट केल्यास १ टक्के शुल्क आणि लागू कर आकारला जाणार आहे.

तसेच, एका बिलिंग सायकलमध्ये इंधनावरील एकूण खर्च ५० हजार रुपयांपेक्षा जास्त झाल्यास संपूर्ण इंधन खर्चावर १ टक्के अतिरिक्त शुल्क लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे SBI कार्डधारकांनी आपल्या खर्चाचे नियोजन करताना या नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.
RBI च्या निर्णयाकडे लक्ष; कर्जदारांना फटका बसणार?
रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची बैठक २ ते ४ डिसेंबरदरम्यान होणार आहे. या बैठकीत रेपो रेटचा आढावा घेतला जाणार आहे. रेपो रेटमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम बँकांच्या कर्ज आणि ठेवींच्या व्याजदरांवर होऊ शकतो.
होम लोनचा EMI वाढणार की कमी होणार?
रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास बँका गृहकर्जासह इतर फ्लोटिंग व्याजदराच्या कर्जांचे व्याजदर वाढवू शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या मासिक हप्त्यात (EMI) वाढ होण्याची किंवा कर्जफेडीचा कालावधी वाढण्याची शक्यता असते.
दुसरीकडे, बँका नव्या फिक्स्ड डिपॉझिटवर अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र, कर्ज आणि एफडीच्या व्याजदरांमधील बदल बँकांच्या धोरणांवर आणि बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असतील.
आधारशी लिंक ईमेल अपडेट करण्याची सुविधा
आधार कार्डमध्ये ईमेल आयडी जोडणे किंवा आधीचा ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी UIDAI कडून ७५ रुपयांचे शुल्क माफ करण्यात आल्याची माहिती आहे. ही सुविधा ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
अधिकृत आधार मोबाईल ॲपच्या माध्यमातून ईमेल अपडेट करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आधारशी ईमेल आयडी जोडायचा किंवा जुना ईमेल बदलायचा असल्यास नागरिकांना ही संधी महत्त्वाची ठरू शकते.
१ डिसेंबरला गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार?
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार १ डिसेंबर रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
विशेषतः १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींकडे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. तर १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर होऊ शकतो.
त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेपासून होणाऱ्या संभाव्य बदलांकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. आर्थिक व्यवहार, कर्जाचे हप्ते आणि घरगुती खर्चाचे नियोजन करताना या बदलांची माहिती असणे महत्त्वाचे ठरणार आहे.
