कच्च्या तेलाच्या दरवाढीने भारताचे गणित बिघडले! आयात खर्चात ६० टक्क्यांची वाढ, LPG वापरात मोठी घट

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात देशाचे निव्वळ तेल आणि नैसर्गिक वायू आयात बिल वार्षिक तुलनेत तब्बल ६० टक्क्यांनी वाढून १६ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे बिल १० अब्ज डॉलर होते. ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे भारताला तेल आयातीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला तेलाचा आयात खर्च वाढत असताना दुसरीकडे देशातील एलपीजी आणि नैसर्गिक वायूच्या वापरात घट झाल्याचेही समोर आले आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ; आयात खर्च वाढला

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाने (PPAC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये भारताने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी १९.५ अब्ज डॉलर खर्च केले. या काळात तेल आयातीचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढून २३.३ दशलक्ष टन झाले. ऑक्टोबर २०२५ मध्ये ब्रेंट कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति पिंप ६४.७५ डॉलर होती. ती ऑक्टोबरमध्ये वाढून १२४.७७ डॉलरवर पोहोचली. भारताच्या तेल बास्केटचा दरही ६५.०८ डॉलरवरून ११९.९१ डॉलर प्रति पिंप झाला. त्यामुळे देशाच्या आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे.

नैसर्गिक वायूच्या वापरातही घट

डिझेल आणि पेट्रोलच्या मागणीत वाढ झाली असली, तरी नैसर्गिक वायूच्या वापरात घट नोंदवण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक वायूचा वापर ७.२७ टक्क्यांनी घसरून ५,७०७ दशलक्ष घनमीटरवर आला. तर द्रवरूप नैसर्गिक वायूच्या (LNG) आयातीत ६.९४ टक्क्यांची घट झाली. देशाच्या नैसर्गिक वायूच्या एकूण गरजेपैकी ५२.८ टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते.
LPG वापरात १२.३ टक्क्यांची घट; ग्राहकांची संख्याही कमी
स्वयंपाकाच्या गॅसच्या वापरातील घट हा या आकडेवारीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये एलपीजीच्या वापरात १२.३ टक्क्यांची घट झाली. तर एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत एलपीजीचा वापर १५.१ टक्क्यांनी कमी झाला.
देशातील सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांची संख्या १ एप्रिल २०२६ रोजी ३३.४ कोटी होती. ती १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत कमी होऊन ३२.६ कोटी झाली. म्हणजेच, या कालावधीत सक्रिय ग्राहकांची संख्या सुमारे ८० लाखांनी घटली आहे.
खासगी कंपन्यांकडून थेट होणाऱ्या एलपीजी आयातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत मोठी घट झाली. मोठ्या प्रमाणातील एलपीजी विक्रीतही ४९.१ टक्क्यांची घसरण झाली. मात्र, वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑटो एलपीजीच्या विक्रीत २३.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?
भारताला कच्च्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग परदेशातून आयात करावा लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यास देशाच्या आयात बिलात वाढ होते. याचा परकीय चलन साठ्यावर आणि रुपयाच्या मूल्यावर दबाव निर्माण होऊ शकतो. तसेच वाहतूक, उत्पादन आणि इतर क्षेत्रांचा खर्च वाढण्याची शक्यता असते.
मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किरकोळ किमतींवर किती परिणाम होईल, हे देशांतर्गत किंमत धोरण आणि इतर आर्थिक घटकांवर अवलंबून असेल. त्यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती आणि इंधनाच्या मागणीतील बदल याकडे लक्ष लागले आहे.
