नाशिकमधील प्रसिद्ध मिसळ हॉटेल्स एफडीएच्या रडारवर! ५ ठिकाणी धडक कारवाई; तपासणीत धक्कादायक प्रकार उघड

नाशिक : तुकाराम मुंढे यांच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलवर कारवाई करत परवाना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता एफडीएने नाशिकमध्येही मोठी कारवाई केली आहे. शहरातील पाच नामांकित हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील कॉलेज रोडवरील दुर्गा कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. तर तुषार मिसळ, शामसुंदर आणि विहार या प्रसिद्ध हॉटेल्सचीही तपासणी करून कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली.

हॉटेल विहार आणि शामसुंदरमध्ये गंभीर त्रुटी

जुना गंगापूर नाका परिसरातील गंगापूर रोडवर असलेल्या प्रसिद्ध हॉटेल विहारमध्ये तपासणीदरम्यान अस्वच्छता आढळली. तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक आणि इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा व मानक नियमांचेही उल्लंघन झाल्याचे आढळले.

सातपूर एमआयडीसी परिसरातील हॉटेल शामसुंदरमध्येही एफडीएच्या अधिकाऱ्यांना गंभीर त्रुटी आढळल्या. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, स्वच्छतेचा अभाव आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटींमुळे प्रशासनाने कारवाई केली.
दुर्गा कॅफे आणि तुषार मिसळलाही दणका
कॉलेज रोडवरील दुर्गा कॅफेमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले. तसेच मेन्यू कार्ड किंवा डिस्प्लेवर स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.
असवारी चौकासमोरील तुषार मिसळमध्ये अन्नपदार्थ साठवण्यासाठी अपुरी जागा आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळले. याशिवाय अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचेही तपासणीत समोर आले.
महाराजा काठियावाडीतही अस्वच्छता उघड
आडगाव फाटा येथील हॉटेल महाराजा काठियावाडीवरही एफडीएने कारवाई केली. तपासणीदरम्यान हॉटेलच्या स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आढळली. तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी धूळ आणि कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने या हॉटेलवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
