भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा मैदानात उतरणार; महामुकाबल्याची वेळ ठरली, LIVE सामना कुठे पाहाल?


दोहा : क्रिकेटविश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांचे संघ आमनेसामने येणार आहेत. रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेत रविवारी (२२ नोव्हेंबर) भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करणार असून, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि रिंकू सिंग यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. त्यामुळे रविवारी मैदानात कोण बाजी मारणार, याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे.

दोन्ही संघांची विजयी सुरुवात; आता थेट एकमेकांशी टक्कर

स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारत अ संघाने नेपाळचा तब्बल ३०६ धावांनी पराभव करत आपली ताकद दाखवून दिली. दुसरीकडे, पाकिस्तान अ संघाने संयुक्त अरब अमिरातीचा ६१ धावांनी पराभव केला. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या आत्मविश्वासासह मैदानात उतरतील. ग्रुप बी मध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती या चार संघांचा समावेश आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना गुणतालिकेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.

सामना कुठे आणि किती वाजता होणार?

भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामना रविवार, २२ नोव्हेंबर रोजी कतारमधील दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी दुपारी ३ वाजता नाणेफेक होणार आहे. दोहाच्या स्थानिक वेळेनुसार सामना दुपारी १ वाजता सुरू होईल.

टीव्ही आणि मोबाईलवर LIVE सामना कसा पाहाल?

या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहता येणार आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील समालोचनाचा पर्याय उपलब्ध असेल. मोबाईल किंवा संगणकावर सामना पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांना सोनीलिव्ह ॲप आणि संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण पाहता येईल.

उपांत्य फेरीचे समीकरण काय?

रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीचे सामने २६ आणि २७ नोव्हेंबरला, तर अंतिम सामना २९ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारताचा सामना २४ नोव्हेंबरला संयुक्त अरब अमिरातीशी होईल. तर पाकिस्तानचा पुढील सामना नेपाळविरुद्ध होणार आहे.

भारत आणि पाकिस्तानचे संघ कसे आहेत?

भारत अ संघ : तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, रिंकू सिंग, कुमार कुशाग्र, रजत पाटीदार, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिन्स यादव आणि अर्शद खान.

पाकिस्तान अ संघ : अब्दुल समद (कर्णधार), शाहजेब खान, हैदर अली, हसन नवाज, माझ सदाकत, रोहेल नझीर, दानिश अझीझ, मोहम्मद इम्रान रंधावा, मोहम्मद हसनैन, अहमद दानियाल, सुफियान मुकीम, अली रझा, साद मसूद, शमील हुसैन आणि फरहान युसूफ.

आता या महामुकाबल्यात भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजांवर वरचढ ठरणार की पाकिस्तानचा संघ भारताला रोखणार, हे रविवारी स्पष्ट होईल. विशेषतः वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांची फलंदाजी चाहत्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!