कॉलेजमध्ये शिकायला गेली, पण १४ तास लिफ्टमध्ये कैद! रात्रभर पोलीस शोधत राहिले, विद्यार्थिनी मात्र इमारतीतच अडकली; पुण्यातील धक्कादायक प्रकार


पुणे : महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीला तब्बल १४ तास लिफ्टमध्ये अडकून राहावे लागल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. वर्ग संपल्यानंतर लिफ्टने जात असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि पाचव्या-सहाव्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट बंद पडली. विशेष म्हणजे, विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याने तिचे कुटुंबीय आणि पोलीस रात्रभर शोध घेत होते; मात्र ती महाविद्यालयाच्या इमारतीतील लिफ्टमध्येच अडकली असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. या घटनेमुळे नामांकित महाविद्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वर्ग संपल्यानंतर ही विद्यार्थिनी लिफ्टमध्ये शिरली. त्या वेळी लिफ्टमध्ये तिच्याशिवाय अन्य कोणीही नव्हते. ती खाली जात असतानाच अचानक वीज गेली आणि लिफ्ट पाचव्या व सहाव्या मजल्याच्या मध्येच थांबली. बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने विद्यार्थिनी घाबरली. तिने लिफ्टचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, दरवाजावर जोरजोरात हात मारले आणि मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, तिचा आवाज बाहेर कोणापर्यंत पोहोचला नाही.

मोबाईलला नेटवर्क नाही, मदतीसाठी संपर्कही अशक्य

लिफ्टमध्ये अडकल्यानंतर विद्यार्थिनीने मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु नेटवर्क उपलब्ध नसल्याने फोन लागत नव्हता. त्यामुळे मदत मागण्याचा मार्गही बंद झाला. अन्न-पाण्याविना तिला लिफ्टमध्येच तासन्तास काढावे लागले. दरम्यान, घरी मुलगी परतली नाही आणि तिच्याशी संपर्कही होत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

मध्यरात्री बेपत्ता असल्याची तक्रार; रात्रभर शोधमोहीम

कुटुंबीयांनी सुरुवातीला परिसरात आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, काहीच माहिती मिळाली नाही. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस, महाविद्यालयातील कर्मचारी आणि कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, ज्या महाविद्यालयाच्या परिसरात शोधमोहीम सुरू होती, त्याच ठिकाणच्या लिफ्टमध्ये ती अडकली असल्याचे कोणालाही समजले नाही. गुरुवारी सकाळी इमारतीची लिफ्ट नेहमीप्रमाणे सुरू झाल्यानंतर तब्बल १४ तासांनी विद्यार्थिनीची सुटका झाली. इतका वेळ एकटीने अडकून राहिल्यामुळे ती प्रचंड घाबरली होती.

महाविद्यालयाने स्थापन केली चौकशी समिती

घटनेची माहिती मिळताच महाविद्यालय प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी संबंधित परिसरातील वीजपुरवठा पाच ते सहा वेळा खंडित झाला होता. लिफ्ट बंद पडण्यामागील तांत्रिक कारणांसह संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे. प्रशासन पोलिसांच्या संपर्कात असून, तपासात कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेने महाविद्यालयातील लिफ्टची देखभाल, वीज गेल्यानंतरची पर्यायी व्यवस्था आणि आपत्कालीन मदत यंत्रणा याबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. लिफ्टमध्ये एखादी व्यक्ती अडकली तर तिच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी नेमकी कोणती व्यवस्था होती, याची उत्तरे आता चौकशीतून समोर येणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!