लोणी काळभोरच्या वैभव लाडची धावपट्टीवर चमक! ३००० मीटरमध्ये कांस्यपदकाची कमाई, १५०० मीटरमध्येही दमदार कामगिरी..

लोणी काळभोर : जिद्द, जिगर आणि अफाट सहनशक्तीच्या जोरावर लोणी काळभोरच्या वैभव तुकाराम लाड याने धावपट्टीवर आपली छाप उमटवली. बोईसर (जि. पालघर) येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांक पटकावत त्याने कांस्यपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, १५०० मीटरच्या शर्यतीतही पाचवा क्रमांक मिळवत त्याने दुहेरी यशाची नोंद केली.
TAIPS 3 & 4 Colony Maidan, बोईसर येथे या ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित इंग्लिश मीडियम स्कूल, लोणी काळभोरच्या १७ वर्षांखालील मुलांच्या गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये वैभवने आपल्या वेगवान धावण्याने आणि दमदार कामगिरीने लक्ष वेधून घेतले.

३००० मीटरच्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्यांशी शेवटपर्यंत झुंज देत त्याने तिसरे स्थान मिळवले. नियमित सराव, शिस्त, चिकाटी आणि शारीरिक क्षमतेच्या जोरावर त्याने कांस्यपदकाची कमाई केली. तर १५०० मीटरच्या शर्यतीतही पाचवे स्थान मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

वैभवच्या या यशामुळे लोणी काळभोरच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव व प्रशासक एस. एम. गवळी, स्थानिक सल्लागार मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्णिमा शेवाळे, क्रीडा विभागप्रमुख व पी. टी. शिक्षिका प्रिया सरकार तसेच शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. भविष्यातही क्रीडा क्षेत्रात अशीच यशस्वी कामगिरी करण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

