‘राजयोग संपला!’ १०० नव्हे ५०० टक्के मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारबाबत मोठं राजकीय भाकीत केलं आहे. मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत. एप्रिल-मे महिन्यापर्यंत ते सत्तेतून पायउतार होतील, तर २०२९ पर्यंत देशात मोठं राजकीय परिवर्तन घडेल, असा दावा राऊत यांनी केला. ते आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
राजस्थानच्या निकालावरून राऊतांचा दावा

राजस्थानमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी देशातील राजकीय वातावरण बदलत असल्याचा दावा केला. राजस्थानमधील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला.

“देशातील वातावरण झपाट्याने बदलत आहे. राजस्थानमधील निवडणुकांचे प्रतिबिंब देशभर दिसेल. जनतेचा दबाव निवडणूक यंत्रणेवर आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये गडबड आणि घोटाळे करता आले नाहीत. भाजपविरोधातील प्रवाह मतदानातून दिसून आला. हा दबाव कायम राहिला, तर २०२९ मध्ये १०० नव्हे, तर ५०० टक्के मोदींची सत्ता येणार नाही. मोदींचा राजयोग संपला आहे,” असं राऊत म्हणाले.

२०२९ पर्यंत देशात पूर्ण परिवर्तन?
मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीवर प्रशासनाचा विश्वास नसल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. सध्याचं सरकार लवकर जावं, असं अनेकांना वाटत असल्याचं ते म्हणाले. एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत मोदी सत्तेतून पायउतार होतील आणि २०२९ पर्यंत देशात पूर्ण परिवर्तन झालेलं दिसेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबतही त्यांनी भाष्य केलं.
‘मोदींनीही रोजगाराचा प्रश्न मान्य केला’
देश आर्थिक अराजकाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा करत राऊत यांनी राहुल गांधींच्या भूमिकेचा उल्लेख केला. उद्योगपतींना सवलती दिल्यानंतरही रोजगारनिर्मिती का झाली नाही, असा प्रश्न मोदींनी विचारल्याचं त्यांनी सांगितलं. यावरून देशातील रोजगाराचा प्रश्न मोदींनीही मान्य केल्याचा दावा राऊत यांनी केला.
“टिपू सुलतान, भारत-पाकिस्तान या विषयांवर आंदोलनं करता. कधीतरी राष्ट्रीय विचारांवरही आंदोलनं केली पाहिजेत,” असंही राऊत म्हणाले.
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवर भाष्य
नाशिक महापालिकेत संख्याबळ कमी असतानाही ठाकरे गटाचे दोन नगरसेवक स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाल्याच्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. हेमंत गायकवाड आणि बाबा गायकवाड यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याचं त्यांनी सांगितलं.
“आमचं संख्याबळ एका जागेसाठी पुरेसं होतं; मात्र आमचे दोन नगरसेवक निवडून आले. भाजपमध्ये काही अंतर्गत गोंधळ झाला असेल. त्यांना दुसऱ्याचं बेकायदेशीरपणे ओरबाडता आलं नाही किंवा त्यांनी दिलेल्या नावांवर त्यांच्यात मतभेद झाले असतील. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला.
