शिंदेंच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोठी खेळी! माजी आमदार श्रीनिवास वनगांनी अचानक पक्ष सोडला; रवींद्र चव्हाणांच्या एका दौऱ्यात पालघरचं राजकारण बदललं?


पालघर : राज्याच्या सत्तेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र असली, तरी पालघरमध्ये मात्र मित्रपक्षांमधील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे पालघरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, वनगा यांच्यासोबत जव्हारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हबीब शेख तसेच काही सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजपने पालघरमध्ये एकाच वेळी दोन पक्षांना धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उमेदवारी नाकारल्यापासून वनगा नाराज

श्रीनिवास वनगा हे पालघर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांचे वडील चिंतामण वनगा हे भाजपचे माजी खासदार होते. त्यांच्या निधनानंतर २०१८ मध्ये श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेनेकडून निवडणूक लढवत त्यांनी आमदारकी मिळवली. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आणि त्यांच्या गटात काम सुरू ठेवले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पालघरमधून पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी वनगा यांना अपेक्षा होती. मात्र, शिंदे गटाने त्यांच्या जागी माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. यामुळे वनगा प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी जाहीरपणे आपली खंत व्यक्त करत शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचेही म्हटले होते. या घडामोडींनंतर ते पक्षाच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर झाले होते.

रवींद्र चव्हाणांच्या दौऱ्यात पक्षप्रवेशाची घडामोड

बुधवारी, १९ नोव्हेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने पालघर दौऱ्यावर आले होते. याच दौऱ्यात वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतले. जव्हारमधील हबीब शेख यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. शेख हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होते. त्यांच्यासोबत स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातील पक्षीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीत नवा पेच निर्माण होणार?

पालघरमध्ये भाजप आणि शिंदे गट महायुतीचा भाग असले, तरी वनगा यांचा भाजप प्रवेश शिंदे गटासाठी स्थानिक पातळीवर महत्त्वाचा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, हबीब शेख यांच्या प्रवेशामुळे जव्हारमधील राष्ट्रवादी काँग्रेसलाही फटका बसू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेली ही राजकीय जमवाजमव महत्त्वाची ठरणार आहे.

आता श्रीनिवास वनगा यांना भाजपमध्ये कोणती जबाबदारी मिळणार, त्यांच्या अनुभवाचा पक्ष कसा उपयोग करणार आणि या प्रवेशामुळे महायुतीतील स्थानिक समन्वयावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पालघरमधील या घडामोडीमुळे आगामी निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!