चॉकलेट-वडापावचे आमिष देऊन दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले; जन्मदात्या पित्याचे धक्कादायक कृत्य उघड


छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चॉकलेट आणि वडापाव खायला देण्याचे आमिष दाखवून फिरायला नेण्याच्या बहाण्याने वडिलांनीच आपल्या दोन चिमुकल्या मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, दोन्ही मुलांचा शोध सुरू आहे.

श्याम (वय ५) आणि आर्यन (वय ७) अशी बेपत्ता बालकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१७ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचे वडील सोमनाथ रोडगे यांनी चॉकलेट आणि वडापाव खायला देण्याचे आमिष दाखवून दोघांना दुचाकीवरून बाहेर नेले.

‘पप्पा, नको ना…’ म्हणत मुलांची विनवणी

दोन्ही मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ नेल्यानंतर त्यांना पाण्यात ढकलल्याचा आरोप आहे. यावेळी घाबरलेल्या मुलांनी वडिलांना रोखण्याचा प्रयत्न करत ‘पप्पा, नको ना…’ अशी विनवणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतरही मुलांना कालव्यात फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला; दगडफेकीचाही आरोप

कालव्यावरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी आलेल्या काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी सोमनाथ रोडगे याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने शेतकऱ्यांवर दगडफेक करत शिवीगाळ केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत मुलांना कालव्यात फेकल्याची कबुली

पोलिसांनी सुरुवातीला चौकशी केली असता सोमनाथ रोडगे याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर त्याने दोन्ही मुलांना कालव्यात फेकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या कृत्यामागील कारण आणि कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी तपासली जात आहे.

रात्रीपासून शोधमोहीम; अद्याप मुलांचा शोध नाही

दरम्यान, श्याम आणि आर्यन या दोन्ही बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि नातेवाईकांकडून प्रयत्न सुरू आहेत. कालव्यातील पाण्याचा वेगवान प्रवाह शोधकार्यात अडथळा ठरत आहे. वृत्त लिहिपर्यंत दोन्ही मुलांचा शोध लागलेला नव्हता.

या घटनेने संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पित्यावरच असे गंभीर कृत्य केल्याचा आरोप असल्याने नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दोन्ही बालकांचा शोध आणि या घटनेमागील नेमके कारण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!