सुनेत्रा-पार्थ पवारांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे दिग्गज दिल्लीत! अमित शाहांसोबतच्या भेटीमागे अर्थखात्याचा मोठा डाव?


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे काही मोठी हालचाल सुरू आहे का? असा प्रश्न एका राजकीय भेटीमुळे उपस्थित झाला आहे. रविवारी रात्री पक्षातील सात प्रमुख नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र समोर येताच चर्चांना उधाण आले. कारण, या भेटीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणांपासून ते सत्तेतील वाट्यापर्यंत अनेक तर्क लढवले जात आहेत.

या भेटीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. पक्षातील अनुभवी नेत्यांची ही एकत्रित उपस्थिती लक्षवेधी ठरली. मात्र, सुनेत्रा आणि पार्थ पवार या दोघांची अनुपस्थिती चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. पक्षात नाराजी आहे का, नेतृत्वामध्ये काही मतभेद आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत असले तरी याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

अर्थखात्यासाठी अमित शाहांकडे मागणी?

या भेटीमागे राज्याच्या अर्थखात्याचा मुद्दा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जानेवारी २०२६ मध्ये अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर अर्थखाते भाजपकडे गेले. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या; मात्र त्यांना अर्थखाते देण्यात आले नाही. राष्ट्रवादीला हे खाते पुन्हा मिळावे, अशी पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेत हा विषय मांडण्यात आला का, याबाबत उत्सुकता आहे.

निवडणुकीतील पराभवाने पक्षात अस्वस्थता?

अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीला धक्का बसला. छत्रपती संभाजीनगर विभागातील पदवीधर मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पराभव झाला. या निकालानंतर पक्षाच्या कामगिरीवर आणि नेतृत्वावर चर्चा सुरू झाली. त्यातच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील मतभेदांच्या चर्चांनी यापूर्वीही जोर धरला होता. तटकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेटही त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस सध्या राज्यात आणि केंद्रात महायुतीचा घटकपक्ष आहे. अशा वेळी पक्षातील सात वरिष्ठ नेत्यांनी थेट अमित शाह यांची भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. अर्थखात्याची मागणी, पक्षातील संघटनात्मक प्रश्न की महायुतीतील सत्तावाटपाचा मुद्दा, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुनेत्रा-पार्थ यांच्या अनुपस्थितीचे कारण आणि या भेटीतून राष्ट्रवादीच्या पदरात काय पडणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!