फ्लॅटमध्ये सुरू होता देहव्यापार; ग्राहक बनून पोलीस पोहोचले अन् रॅकेटचा पर्दाफाश, २१ वर्षीय तरुणीची सुटका


लातूर : जिल्ह्यात देहव्यापाराच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून, २१ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली आहे. संबंधित तरुणीला जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईदरम्यान एक संशयित घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

लातूर शहरातील मौलीनगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला. एका फ्लॅटमध्ये देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी विशेष युक्ती आखली. शुक्रवारी एका पोलिस कर्मचाऱ्याला ग्राहकाच्या वेशात संबंधित फ्लॅटमध्ये पाठवण्यात आले. तेथे सुरू असलेल्या प्रकाराची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकला.

या कारवाईत जावेद युसूफ सैयद आणि जयश्री राम तरोटे या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर त्यांचा आणखी एक साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी फ्लॅटमधून नागपूर येथील २१ वर्षीय तरुणीची सुटका केली.

चौकशीदरम्यान संबंधित तरुणीने आपल्याला जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे सांगितले. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांचे वाटप दोन्ही आरोपी आणि त्यांच्या अन्य साथीदारांमध्ये होत असल्याची माहितीही समोर आली आहे.

या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि त्याचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!