दुष्काळाने धास्तावलेला बळीराजा अखेर सुखावला! उशीरा का होईना पावसाच्या आगमानाने रब्बी, उन्हाळी हंगामासाठी बळीराजाचा आशा पल्लवीत! जिल्ह्यात कुठे रुसलेला पाऊस बरसला..


पुणे : ऑक्टोबर महिन्यातील असह्य उकाडा, अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर वरुणराजाने सुखद धक्का दिला आहे. शुक्रवारी रात्री आणि रविवारी पहाटे झालेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला असून, दिवाळीच्या तोंडावर निसर्गाने दिलेली ही अनपेक्षित भेट नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान फुलविणारी ठरली आहे.

शहरातील रस्ते, गच्ची, अंगणे आणि माळराने पावसाने चिंब झाली नसली, तरी अधूनमधून बरसलेल्या सरींनी उन्हाच्या काहिलीला काही काळासाठी तरी लगाम घातला आहे. विशेष म्हणजे या पावसाने केवळ माणसांनाच नव्हे, तर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या पशुपक्ष्यांनाही दिलासा दिला आहे.

ऑक्टोबर महिन्यात पुण्यात पावसाने जवळपास दडी मारली होती. भारतीय हवामान विभागाच्या शिवाजीनगर येथील प्रमुख वेधशाळेत संपूर्ण ऑक्टोबरमध्ये अवघ्या १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. २०१४ नंतरचा हा सर्वांत कमी पावसाचा ऑक्टोबर ठरला. त्याचवेळी महिन्यातील सरासरी कमाल तापमान ३४.६६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच उन्हाळ्याचा अनुभव पुणेकरांना घ्यावा लागला. उकाड्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, कामगार आणि रस्त्यावर दिवसभर कष्ट करणाऱ्या घटकांचे हाल झाले होते.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील काही भागांना चांगलाच दिलासा दिला. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत भोर येथे ६७ मिलिमीटर, शिरूर येथे ४५.५ मिलिमीटर, मॅगर्पट्टा येथे १८ मिलिमीटर, निंबगिरी येथे १७ मिलिमीटर, तर पाषाण येथे सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांत शहराच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याने शेतीशिवार आणि परिसरातील वातावरणात बदल जाणवला.

रविवारी पहाटेही पुणे आणि परिसरात हलक्या सरींनी हजेरी लावली. एक नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी परिसरात तीन मिलिमीटर, शिरूर येथे दोन मिलिमीटर, आंबेगाव येथे दीड मिलिमीटर, तर भोर आणि माळीण येथे प्रत्येकी अर्धा मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पाषाण येथे ०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी हवेत निर्माण झालेला गारवा नागरिकांसाठी सुखद ठरला.

पुणे जिल्ह्यातील भोर, शिरूर, आंबेगाव, माळीण, निंबगिरी परिसरासह शहरातील पाषाण, मॅगर्पट्टा आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी परिसरात पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाथा आणि पूर्वेकडील काही भागांत पावसाचे प्रमाण वेगवेगळे राहिले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकसारखा पाऊस झाला, असे चित्र नसले तरी अधूनमधून पडणाऱ्या सरींनी वातावरणातील उष्णता कमी होण्यास मदत केली.

पावसाचे हे आगमन केवळ हवामानातील बदल म्हणून पाहता येणार नाही. उन्हामुळे पाणवठे आटत असताना पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी धडपड, झाडांच्या सावलीत आश्रय घेणाऱ्या जनावरांची अवस्था आणि शेतशिवारातील कोरडेपणा यामुळे ग्रामीण भागातील परिस्थितीही अस्वस्थ करणारी होती. पावसाच्या सरींनी झाडांच्या पानांवर साचलेली धूळ धुऊन निघाली, मातीचा सुगंध दरवळला आणि वातावरणात काहीसा तजेला आला. ज्येष्ठ नागरिकांच्या मते, दिवाळीच्या दिवसांत पावसाची अशी हजेरी लागणे सुखद आहे. मात्र पावसाचा आनंद घेतानाच शेतमालाच्या सुरक्षिततेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला.

पुण्यात सोमवारी दुपारनंतर आणि सायंकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता असून, मंगळवारीही दुपारनंतर पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज आहे. बुधवारी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मात्र हा पाऊस सर्वत्र आणि समान प्रमाणात होईलच असे नाही.

हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत थांबणे, झाडाखाली आश्रय घेणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि कडधान्ये, धान्य तसेच इतर कृषिमाल भिजणार नाही, याची दक्षता घ्यावी.

पावसाच्या सरींनी उकाड्याला काही काळासाठी तरी विराम दिला आहे. मात्र ऑक्टोबरमधील तापमानाचा चढता आलेख आणि पावसाचे असमान वितरण पाहता, या तुरळक सरींना मोठ्या दिलाशाचे स्वरूप देणे घाईचे ठरेल. निसर्गाच्या या लहरीपणात शेतकरी, नागरिक आणि पशुपक्ष्यांना दिलासा देणारा पाऊस नियमित पडावा, हीच अपेक्षा!

आभाळातून पडणारे चार थेंब शहरासाठी गारवा असतात; पण तहानलेल्या पक्ष्यासाठी ते जगण्याची आशा आणि कोरड्या मातीसाठी नव्या हिरवाईची चाहूल असतात!

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!