ठेकेदारांच्या साहित्याची तपासणी कुठे होते? पुणे जिल्हा परिषदेत ‘त्या’ प्रयोगशाळेची मागणी


पुणे : पुणे जिल्हा परिषदेमार्फत कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे सुरू असताना त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. निकृष्ट साहित्याचा वापर रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने स्वतःची स्वतंत्र बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळा उभारावी, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना पत्र देऊन प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणावर विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा टिकवण्यासाठी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या या साहित्याच्या चाचण्यांसाठी कंत्राटदारांना बाहेरील प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागते. काही प्रकारच्या चाचण्या एकाच प्रयोगशाळेत उपलब्ध नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे वेळ आणि प्रक्रियेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होत असल्याचे काकडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

काही कंत्राटदारांकडून विकासकामांसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कामांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेची स्वतःची सक्षम चाचणी यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू झाल्यास बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी अधिक सुलभपणे करता येईल. तसेच विकासकामांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणे आणि निकृष्ट साहित्याचा वापर रोखणे शक्य होईल.

या मागणीमागे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा मुद्दाही जोडला गेला आहे. सध्या काही बांधकाम साहित्याच्या चाचण्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयोगशाळेत केल्या जातात. या चाचण्यांसाठी आकारले जाणारे शुल्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा होते. जिल्हा परिषदेने स्वतःची प्रयोगशाळा उभारल्यास चाचण्यांचे शुल्क जिल्हा परिषदेला मिळू शकते आणि त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे काकडे यांनी सांगितले.

याशिवाय प्रयोगशाळेच्या माध्यमातून काही बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने यापूर्वीच, सुमारे दोन महिन्यांपूर्वी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडे स्वतंत्र बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी केली होती.

त्यामुळे आता काकडे यांच्या पत्रानंतर जिल्हा परिषद या प्रस्तावावर काय निर्णय घेते, तसेच स्वतंत्र प्रयोगशाळा प्रत्यक्षात सुरू होणार का, याकडे जिल्ह्यातील कंत्राटदार आणि विकासकामांशी संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!