पाच दिवस उपाशी, रात्री मदतीसाठी फोन अन् काही तासांत हत्या! ५ वर्षांच्या मुलीसमोर आईसोबत भयानक कांड


बिहार : “मला इथून घेऊन जा, नाहीतर हे लोक मला जिवंत सोडणार नाहीत…” रात्री आई-वडिलांना केलेला हा फोन आणि त्यानंतर काही तासांतच समोर आलेलं धक्कादायक वास्तव. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात अवघ्या २२ वर्षीय आशा देवीचा तिच्या दुसऱ्या पतीने काठीने मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. सर्वात हादरवून टाकणारी बाब म्हणजे, या घटनेवेळी आशाची अवघी पाच वर्षांची मुलगी तिथेच होती.

आशाचं आणि सुजीत पासवानचं हे दोघांचंही दुसरं लग्न होतं. पहिल्या पतीच्या निधनानंतर आशा आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह सुजीतच्या आयुष्यात आली होती. दुसरीकडे, सुजीतच्या पहिल्या पत्नीचा आजारामुळे मृत्यू झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत सुरू होता; मात्र त्यानंतर घरातील परिस्थिती बदलत गेली.

जुन्या नात्यांचा पुन्हा संबंध आणि घरातील वाद

पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुजीतचा त्याच्या पहिल्या सासरच्या मंडळींशी पुन्हा संपर्क वाढल्याची माहिती समोर आली आहे. मुलांच्या संगोपनासह जुन्या संबंधांवरून घरात वारंवार वाद होत असल्याचं सांगितलं जात आहे. याच कौटुंबिक वादातून आशेला कथितपणे तब्बल पाच दिवस अन्नापासून दूर ठेवण्यात आलं. त्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली.

‘मला वाचवा…’ शेवटचा फोन ठरला

४ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे नऊ वाजता आशाने माहेरी फोन केला. तिने आपल्या आई-वडिलांकडे मदतीची याचना करत तिला तिथून घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र रात्री असल्याने माहेरच्यांनी सकाळी येण्याचं ठरवलं. पण सकाळ उजाडण्यापूर्वीच आशावर काठीने हल्ला झाल्याचा आरोप आहे.

आशाचा मृत्यू झाल्यानंतर सुजीतने कुटुंबीयांसह घरातून पलायन केल्याचं समोर आलं. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी फोन करून घटनेची माहिती दिल्यानंतर आशाच्या माहेरच्यांना हा धक्का बसला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना आशाचा मृतदेह आढळला, तर तिची पाच वर्षांची मुलगी या घटनेनंतर एकटी पडली होती.

चिमुरडीच्या जबानीने तपासाला दिशा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचलं. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पाच वर्षांच्या मुलीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सुजीत पासवान आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी तपास सुरू असून, एका चिमुकलीच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!