तिकीट ठरलं, उमेदवार मैदानात उतरले; पण बंडखोरांनी सगळी गणितं बिघडवली? विधान परिषदेच्या ५ जागांवर कुठे कोण आमनेसामने


मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि संभाजीनगर पदवीधर या पाचही मतदारसंघांत प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मात्र अनेक ठिकाणी पक्षातीलच इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे माघारीनंतर कोणकोणते चेहरे प्रत्यक्ष निवडणुकीत राहतात, याची उत्सुकता आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात प्रमुख सामना अपेक्षित आहे. मात्र शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनीही अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या समीकरणांकडे लक्ष लागलं आहे. सचिन सानप यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सुरुवातीला दोन प्रमुख उमेदवारांमध्ये दिसणारी लढत आता अधिक रंगतदार झाली आहे.

पुणे पदवीधरमध्ये भाजपच्या स्मिता जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव मैदानात आहेत. याच मतदारसंघात राष्ट्रवादीचे भैय्या माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने पक्षासमोरच बंडखोरीचं आव्हान निर्माण झालं आहे. माजी आमदार दत्ता सावंत यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारांसोबत अपक्ष दावेदारांचाही प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज भरल्याने भाजपसमोर बंडखोरीचा मुद्दा उभा राहिला आहे. राष्ट्रवादीचे नितेश कराळे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून संजय थुल हे देखील मैदानात आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक उमेदवारांमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. काँग्रेसच्या अदिती पोहरे, ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने आणि शिवसेनेचे किरण सरनाईक हे प्रमुख दावेदार आहेत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू आणि शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही अर्ज दाखल केला आहे. युवा स्वाभिमान संघटनेच्या प्रीती रेवणे यांच्यासह शेखर भोयर, सुमित पवार, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या बहिणी संगीता शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांच्यात प्रमुख सामना आहे. मात्र भाजपचे नेते एम. के. देशमुख यांनी अर्ज दाखल केल्याने या लढतीत भाजपचीही एंट्री झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबत अतिरिक्त दावेदारांचं आव्हान आहे.

या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपानुसार पुणे शिक्षक, पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर या तीन जागा भाजपकडे, अमरावती शिक्षकची जागा शिवसेनेकडे, तर संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र जागावाटपानंतर काही इच्छुकांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने आघाड्यांच्या अंतर्गत राजकारणाचीही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा संपला असला तरी अंतिम लढतीचं चित्र अजून बाकी आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर माघारीची प्रक्रिया होणार असून, त्यानंतरच कोण मैदानात कायम आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे पाच मतदारसंघांमध्ये कोण माघार घेतं, कोण बंड कायम ठेवतं आणि अखेर कोणाकोणात थेट सामना रंगतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!