दारूच्या नशेत बापाचं घृणास्पद कृत्य; अखेर मुलीचा संताप अनावर, बॅटने हल्ला करून संपवलं, नागपूर हादरलं..

नागपूर : घरातच सुरक्षितता धोक्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. वडिलांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या १७ वर्षीय मुलीने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत सतत मारहाण आणि अयोग्य जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांचा मुलीनेच लाकडी बॅटने घाव घालत जीव घेतला आहे. मुलगी ही अल्पवयीन आहे. मुलीचे वडील हे रोज रात्री घरी दारूच्या नशेत येत असे. दारुच्या नशेत मुलीला घरी आल्यानंतर रोज मारहाण केली जात असे. सततच्या मारहाणीला मुलगी कंटाळली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील हे दारूच्या आहारी गेले होते. ते मुलीला सतत शिवीगाळ तसेच मारहाण करत आणि तिच्यावर वाईट नजर ठेवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोमवारी रात्री दारूच्या नशेत घरी आल्यानंतर त्यांनी मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.


मुलीने विरोध केल्याने त्यांनी तिला मारहाण केली. त्यानंतर संतप्त मुलीने घरातील लाकडी बॅटने त्यांच्या डोक्यावर वार केला. गंभीर दुखापतीमुळे जयपाल यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी १७ वर्षीय मुलीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
