चार दिवसांचं आंदोलन पोलिसांच्या रडारवर; ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा, २९ क्लास-अभ्यासिका चालकही अडचणीत; पुढे काय?

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता पोलिसांच्या कारवाईची किनार मिळाली आहे. गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी ५१ विद्यार्थी आणि २९ क्लास व अभ्यासिका चालकांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एस. एम. जोशी पूल, टिळक चौक आणि शास्त्री रस्ता या ठिकाणी हजारो विद्यार्थी एकत्र आले आहेत. परीक्षा पद्धती, आयोगाचा कारभार आणि विविध निर्णयांविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनाला राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील व्यक्तींनीही भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.

मात्र, आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे आयोजकांना आंदोलन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आंदोलन सुरूच राहिल्यानंतर पोलिसांनी आता कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. आंदोलनस्थळी चित्रीकरण करून परिस्थितीची नोंदही घेतली जात आहे.


कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तिन्ही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आयोजकांना दिलेल्या सूचना, आंदोलनाचं चित्रीकरण आणि त्यानंतरही सुरू असलेली निदर्शनं याची माहिती एकत्र करून त्याआधारे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनादरम्यान आकाशात ड्रोन उडत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. हे ड्रोन नेमकं कोणी आणि कशासाठी उडवलं, याचा तपास सुरू आहे. आंदोलनाचं चित्रीकरण किंवा अन्य कारणासाठी ड्रोनचा वापर झाल्याचं आढळल्यास संबंधितांवरही कारवाई होऊ शकते. ड्रोन उडवण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते; मात्र, अशी परवानगी घेतली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच नोटिसा, चित्रीकरण आणि ड्रोनप्रकरणी चौकशी सुरू झाल्याने आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
