लेकीचा खून करून पुरावे पुसण्याचा प्रयत्न; रक्ताने माखलेला शर्ट धुतला अन् बापाचा भांडाफोड झाला, नेमकं प्रकरण काय?

सातारा : साताऱ्यात जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने अनेक प्रयत्न केले. मात्र, अखेर त्याने मदतीसाठी चक्क एआयची मदत घेण्याचा प्रयत्न केला. “माझ्या हातून नकळत मुलीचा खून झाला, पुरावे कसे नष्ट करू?” असा प्रश्न त्याने एआयला विचारला. मात्र, एआयने गुन्ह्याला मदत करण्यास स्पष्ट नकार देत पोलिसांना माहिती देण्याचा सल्ला दिला.
नेमकं काय घडलं?

साताऱ्यातील गोडोली परिसरात शिक्षक असलेल्या व्यक्तीने शनिवारी रात्री आपल्या मुलीचा खून केला. घटनेनंतर आरोपी पूर्णपणे गोंधळून गेला. खुनाचा पुरावा कसा नष्ट करायचा आणि पोलिसांना काय सांगायचं, याचा तो विचार करत होता.


काही काळ वेगवेगळे प्रयत्न केल्यानंतर त्याला एआयची आठवण झाली. त्याने मोबाईलवरून एआयला विचारलं, “माझ्या हातून नकळत मुलीचा खून झाला आहे. पुरावे कसे नष्ट करू? पोलिसांना काय उत्तर देऊ?”
एआयने दिलं थेट उत्तर
आरोपीने गुन्ह्यातून सुटण्यासाठी एआयकडून मार्गदर्शन मागितलं. मात्र, एआयने त्याला गुन्हेगारी कृत्याला मदत करणारी माहिती देण्यास नकार दिला. तसेच ही गंभीर चूक असून पोलिसांना तातडीने माहिती देण्याचा सल्ला दिला.
रक्ताचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
एआयकडून मदत न मिळाल्यानंतर आरोपीने स्वतःच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेला टी-शर्ट त्याने वॉशिंग मशीनमध्ये तीन वेळा धुतला. घरातील फरशीवरील रक्ताचे डागही पुसून काढले. त्यानंतर रक्ताने माखलेली बॅट टेरेसवर नेऊन टाकली.
पोलिसांसमोर सांगितली वेगळीच कहाणी
तपास भरकटवण्यासाठी आरोपीने पोलिसांना वेगळी माहिती दिली. घरगुती कारणातून मुलीने स्वतःच भिंतीवर डोकं आपटून घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचं त्याने सांगितलं. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना त्याच्या कथनावर संशय आला.
भिंतीवर रक्ताचे डाग आढळले, तर टेरेसवर रक्ताने माखलेली बॅट सापडली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
मोबाईल तपासला अन् एआयचं रहस्य समोर आलं
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तपासासाठी त्याचा मोबाईलही ताब्यात घेतला. मोबाईल तपासताना आरोपीने खून केल्यानंतर एआयकडे पुरावे नष्ट करण्याबाबत विचारणा केल्याची माहिती पोलिसांच्या समोर आली.
अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला आणि आरोपीने खुनाची कबुली दिली. या प्रकरणात गुन्हेगाराला मदत करण्यास नकार देणाऱ्या एआयच्या भूमिकेचीही पोलिसांकडून चर्चा झाली.
