पंचनामे कधी पूर्ण होणार? कृषीमंत्र्यांनी दिली तारीख; शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मोठी माहिती


मुंबई : राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर पंचनाम्यांचं काम सुरू आहे.

आतापर्यंत राज्यातील 44 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, येत्या 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत 100 टक्के पंचनामे पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

राज्य सरकारने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत तब्बल 1 कोटी 49 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. सध्या 44 टक्के काम पूर्ण झालं असून, 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचं भरणे यांनी सांगितलं.

एखादा-दुसरा दिवस पुढे-मागे होऊ शकतो; मात्र पंचनामे पूर्ण केले जातील. जळालेल्या पिकांचाही पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असंही कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

कोणत्या विभागात किती पंचनामे?

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंचनाम्यांच्या कामाची जिल्हानिहाय माहितीही दिली. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 68 टक्के काम पूर्ण झालं आहे. अमरावतीत 55 टक्के, पुण्यात 30 टक्के, तर नागपूरमध्ये 25 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोकण विभागात पंचनाम्यांचं काम सर्वात कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

दुष्काळ निवारण समितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पंचनाम्यांच्या कामावर लक्ष असल्याचंही भरणे यांनी सांगितलं.

केंद्रीय पथकाकडून पाहणी

दरम्यान, केंद्रीय पथकाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत पाहणी पूर्ण करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे. केंद्रीय पथकाने मदत देण्याचं आश्वासन दिल्याचं भरणे यांनी सांगितलं.

राज्य सरकारही शेतकऱ्यांना मदत करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही. अडचणीच्या काळात सर्व विभागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असं कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

17 हजार कोटींची मदत मागितली

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा आणि इतर मदतीसाठी केंद्राकडे 17 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं भरणे यांनी सांगितलं.

तसंच दुष्काळी तालुक्यांच्या यादीत आणखी 19 तालुक्यांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गरज भासल्यास आणखी तालुक्यांची संख्या वाढवली जाईल. सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात मिळावा, हा सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

यवतमाळमधून महिला शेतकऱ्यांचे सर्वाधिक अर्ज

महिला शेतकरी विधेयकाबाबतही कृषीमंत्र्यांनी माहिती दिली. या योजनेसाठी आतापर्यंत 33 लाख महिलांनी ऑनलाइन अर्ज केले असून, यवतमाळ जिल्ह्यातून सर्वाधिक 2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.

भविष्यात महिलांनाही या योजनांचा लाभ मिळणार असून, ज्यांच्या नावावर सातबारा नाही, अशा महिलांनी शेतकरी प्रमाणपत्राचा लाभ घ्यावा, असं आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!