पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठा दिलासा! गर्दीच्या वेळेत दर 5 मिनिटांनी धावणार मेट्रो; 6 डब्यांच्या ट्रेनबाबतही मोठी अपडेट


पुणे : पुणे शहरातील मेट्रो प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पीक आवर्समध्ये स्थानकांवर तसेच मेट्रोमध्ये मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर महामेट्रो प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

गर्दीच्या वेळेत मेट्रोची फ्रीक्वेन्सी वाढवून आता दर 5 मिनिटांनी मेट्रो चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची गर्दी आणखी वाढल्यास हा अंतराल कमी करून दर 4 मिनिटांनी मेट्रो चालवण्याचीही तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.

पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल 93.58 लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. एका महिन्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या ठरली आहे. सप्टेंबरमध्ये दररोज सरासरी 3.1 लाखांहून अधिक प्रवासी मेट्रोचा वापर करत होते. गणेशोत्सवाच्या काळातील गर्दीमुळे प्रवासीसंख्येत वाढ झाली असली, तरी नियमित प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

नव्या मार्गामुळे आणखी 50 हजार प्रवासी वाढण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत शिवाजीनगर ते हिंजवडी या नव्या मेट्रो मार्गावर सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत आणखी सुमारे 50 हजार प्रवाशांची भर पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात मेट्रोवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, मेट्रोमधील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. मेट्रोचे नेटवर्क विस्तारत असून नवीन मार्गही सुरू होत आहेत. भविष्यात वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा विचार करून नवीन मेट्रो गाड्यांची खरेदी करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांची 6 डब्यांच्या मेट्रोची मागणी

सध्या पुण्यात वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पीसीएमसी हे दोन मेट्रो मार्ग कार्यरत आहेत. या दोन्ही मार्गांवर विशेषतः पीक आवर्समध्ये मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांकडून 6 डब्यांच्या मेट्रोची मागणी केली जात आहे.

गर्दीच्या वेळेत किमान 6 डब्यांची मेट्रो सुरू केल्यास प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि प्रवासाचा त्रास कमी होईल, अशी मागणी आहे. शिवाजीनगर येथील नागरिक आदित्य काळे यांनीही याबाबत सूचना केली आहे. पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्म 6 डब्यांच्या ट्रेनसाठी सक्षम असल्याने तांत्रिक अडचण नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आधी फेऱ्या वाढणार, त्यानंतर 6 डब्यांची मेट्रो

दरम्यान, 6 डब्यांच्या मेट्रोबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. हा अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी प्रवाशांना तातडीचा दिलासा देण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्यावर प्रशासनाचा भर आहे.

सध्या गर्दीच्या वेळेत दर 5 मिनिटांनी मेट्रो चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गरज भासल्यास हा अंतराल 3 ते 4 मिनिटांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात 6 डब्यांच्या मेट्रो गाड्या प्रत्यक्ष सेवेत आणण्याची तयारी महामेट्रोने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!