मुंबईचा डाव रद्द, आता नारायणगडावर काय घडणार? जरांगेंनी दिली मोठी हाक

जालना : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनाची हाक देऊन नंतर त्यातून माघार घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता पुढील मोठ्या जमावाची घोषणा केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नारायणगडावर दसरा मेळावा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, मराठा समाजाने या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे नारायणगडावरील यंदाचा दसरा मेळावा आणि तिथून होणाऱ्या संभाव्य पुढील घोषणांकडे लक्ष लागलं आहे.
जालन्यात बोलताना जरांगे पाटील यांनी एकाच वेळी मराठा आरक्षण, दुष्काळ, शेतकरी प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून सरकारला लक्ष्य केलं. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांच्यात मिलीभगत आहे का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत लोकांमध्ये नाराजी असल्याचा दावा करत त्यांनी सरकारने यावर भूमिका घ्यावी, असं म्हटलं.

दुसरीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावरूनही जरांगे आक्रमक झाले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी का होत नाही, असा सवाल करत गावागावात चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. जनता सत्तेवर बसवू शकते, तर सत्तेतून खालीही खेचू शकते, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला.


मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन करणाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाज आरक्षण मागतो म्हणून दादागिरी करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्याला आणि मराठा आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचं सांगत आता संयमाचा बांध तुटणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
सरकारसमोर झुकवण्यासाठी कोणतेही डाव टाकले गेले, तर मराठा समाजाने त्यापेक्षा शंभरपट ताकदीने एकत्र यावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं. सरकारवर टीका करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अन्यायकारक कारभाराचा आरोप केला.
दरम्यान, नारायणगडावर होणारा दसरा मेळावा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने नारायणगडावर यावं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई आंदोलनानंतर आता नारायणगडावर मराठा समाजाची किती मोठी उपस्थिती राहणार आणि या मेळाव्यात जरांगे पाटील पुढची कोणती घोषणा करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
