‘छाती फाडली तर पवारच दिसतील’ म्हणणाऱ्या शेतकऱ्याला पवारांनी भाजपचं पत्र दाखवलं; ‘मग हे काय?’ म्हणताच पिकला एकच हशा!

बारामती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती घेण्यासाठी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणाऱ्या शरद पवारांसोबत जवळार्जुन गावात एक भन्नाट प्रसंग घडला. एका शेतकऱ्याने पवारांवरील निष्ठा व्यक्त करताना ‘छाती फाडली तरी साहेबच दिसतील’ असं म्हटलं. उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या; मात्र पवारांनी लगेच त्या शेतकऱ्याने दिलेलं भाजपच्या लेटरहेडवरील पत्र हातात घेतलं आणि कमळाचं चिन्ह दाखवत ‘मग हे काय आहे?’ असा मिश्कील सवाल केला. पवारांच्या या प्रश्नाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत असून गावागावांत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. वयाच्या ८६व्या वर्षीही ते रणरणत्या उन्हात शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. जवळार्जुनमध्ये त्यांनी पाणी, चारा, पिकांची परिस्थिती तसेच शेतीशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे निवेदनेही दिली.

यावेळी संबंधित शेतकऱ्याने आपल्या वडिलांची आठवण सांगितली. वडील आपल्याला बारामतीला घेऊन येत असत आणि ‘छाती फाडली तरी साहेबच दिसतील’ असं म्हणायचे, असं त्याने सांगितलं. त्यानंतर पवारांनी त्याच्याकडील भाजपच्या लेटरहेडवरील पत्र दाखवत उपस्थितांना मिश्कील प्रश्न केला. या प्रसंगाची दौऱ्यात चांगलीच चर्चा रंगली.


यानंतर पवारांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. शेती, फळबाग आणि मोटारीसाठी घेतलेलं कर्जही माफ झालं पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
शेतकऱ्यांची वीजबिले माफ करावीत, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत आणि मंजुरीचे अधिकार तालुका पातळीवर द्यावेत, अशी मागणीही पवारांनी केली. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी काही तालुके अद्याप दुष्काळाच्या यादीत नाहीत. त्या तालुक्यांचाही प्रश्न सरकारसमोर मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
गावकऱ्यांनी मेहनत घेऊन गाव आणि शिवाराचा चेहरामोहरा बदलला असून राहणीमानातही सुधारणा झाली आहे. मात्र दुष्काळाचं संकट निर्माण झाल्याने त्यावर मार्ग काढण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले. ‘दुष्काळ असताना तुमच्या-माझ्या हातात काही नाही,’ असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं.
