मतदार यादीतून वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष मोहीम; महाराष्ट्रासह २० राज्यांत राबवणार


मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेदरम्यान वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तिथे ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रथमच मतदान करणारे मतदार तसेच प्रक्रियेदरम्यान यादीतून वगळले गेलेले इतर पात्र मतदार यांचाही समावेश केला जाणार आहे.

निवडणूक आयोगाने २९ सप्टेंबर रोजी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदार यादीच्या अद्ययावतीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून ही विशेष मोहीम राबवायची आहे.

Form 6 द्वारे पुन्हा नाव नोंदवण्याची संधी

SIR प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांमध्ये वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांना Form 6 द्वारे पुन्हा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी दिली जाणार आहे. या मोहिमेत SIRदरम्यान ऑनलाइन Form 6 मध्ये जोडण्यात आलेला अतिरिक्त प्रश्न लागू केला जाणार नाही.

महाराष्ट्रातही विशेष खबरदारी

महाराष्ट्रात SIR प्रक्रिया सुरू असताना पात्र मतदाराचे नाव घाईघाईने वगळले जाऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नोटीस मिळालेल्या मतदारांच्या बाबतीत आता अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) मतदाराच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे घेऊन ती ECINETवर अपलोड करतील. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी (ERO) उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतील.

महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांच्या नोंदी पडताळणीसाठी

महाराष्ट्राच्या प्रारूप मतदार यादीत सुमारे १.२२ कोटी मतदारांच्या नोंदींमध्ये पडताळणीची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. यापैकी ६२.४८ लाख प्रकरणांमध्ये नातेवाईकांच्या माहितीमध्ये तफावत आढळली आहे, तर सुमारे ५९.७६ लाख मतदारांची मागील मतदार यादीतील नातेवाईकांच्या नोंदीशी जुळवणी झालेली नाही.

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर SIR-2026 संदर्भातील प्रारूप मतदार यादी, नाव शोधण्याची सुविधा, ASDD यादी आणि दावे-हरकतींसंबंधी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रक्रियेचा उद्देश SIRदरम्यान काही कारणास्तव मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांना पुन्हा समाविष्ट होण्याची संधी देणे, तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या पात्र नागरिकांची नोंदणी सुनिश्चित करणे हा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!