CJPच्या आंदोलनातच ‘बंड’! मनीष ब्रह्मभट्टांचा नवा पक्ष; दीपके-केजरीवालांवर हायजॅकचा गंभीर आरोप


नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJPच्या आंदोलनाला आता वेगळं वळण मिळालं आहे. आंदोलनाशी सुरुवातीपासून जोडलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर मनीष ब्रह्मभट्ट यांनी स्वतंत्र ‘कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक’ (CJP Democratic) या पक्षाची घोषणा केली. CJPचं मूळ आंदोलन आता अरविंद केजरीवाल यांच्या प्रभावाखाली गेलं असून आंदोलनाचा ताबाच हायजॅक करण्यात आल्याचा गंभीर आरोप ब्रह्मभट्ट यांनी केला आहे.

अहमदाबादचे रहिवासी असलेल्या मनीष ब्रह्मभट्ट यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या CJP आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आंदोलन उभं करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या मूळ कार्यकर्त्यांना नंतर निर्णय प्रक्रियेतून दूर करण्यात आलं, असा त्यांचा दावा आहे. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर त्याची दिशा बदलली आणि CJP ही आता केवळ ‘टीम केजरीवाल’ बनल्याचा आरोप त्यांनी केला.

या संपूर्ण वादात CJPचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्यावरही ब्रह्मभट्ट यांनी थेट निशाणा साधला. दीपके यांनी घरबसल्या १२ जणांची टीम तयार केली आणि त्यासाठी मूळ आंदोलनातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, असा आरोप त्यांनी केला. या नियुक्त्यांसाठी कोणते निकष वापरण्यात आले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या टीममध्ये आम आदमी पक्षाशी संबंधित आठ व्यक्ती, तसेच कॉलेजमधील मित्र आणि मैत्रिणींना स्थान दिल्याचा दावा ब्रह्मभट्ट यांनी केला.

CJPमध्ये निर्णय घेण्याची सत्ता एका व्यक्तीकडे केंद्रित होऊ नये, यासाठी प्रत्येक राज्यातून पाच प्रतिनिधी असावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कोणालाही ‘राजा’ किंवा हुकूमशहा बनून निर्णय घेता येणार नाही, अशी भूमिका होती. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली आणि मनमानी पद्धतीने कारभार सुरू झाल्याचा आरोप ब्रह्मभट्ट यांनी केला.

‘केजरीवालांनी आंदोलनाचा ताबा घेतला’

अरविंद केजरीवाल यांच्यावरही ब्रह्मभट्ट यांनी गंभीर आरोप केले. CJPसाठी नवीन टीम उभारण्याची कल्पना केजरीवाल यांचीच असल्याचा त्यांचा दावा आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून राजकीय फायदा घेतल्यानंतर आता CJPच्या आंदोलनासोबतही तसंच झाल्याचा आरोप त्यांनी केला.

केजरीवाल यांनी राजकारणात येताना जनतेच्या सहभागातून उमेदवार निवड आणि स्वराज्याची आश्वासनं दिली होती; मात्र सत्ता मिळाल्यानंतर स्वराज्य कायदा बाजूला पडल्याचा दावा ब्रह्मभट्ट यांनी केला. त्याचप्रमाणे CJP आंदोलन यशस्वी झाल्यानंतर केजरीवाल यांनी अभिजीत दीपके यांच्यासोबत ‘डील’ करून आंदोलन हायजॅक केल्याचा आरोप त्यांनी केला.

सामाजिक प्रतिनिधित्वावरही सवाल

CJPच्या नव्या कार्यकारिणीत मुस्लिम आणि शीख समाजातील प्रतिनिधींना स्थान देण्यात आलं नसल्याचा आरोपही ब्रह्मभट्ट यांनी केला. आम आदमी पक्षाशी संबंधित लोकांना सामावून घेण्यासाठी तडजोडी करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. या सर्व कारणांमुळे मूळ CJPपासून वेगळं होत CJP Democratic स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे आंदोलनातून उभ्या राहिलेल्या CJPमध्येच आता उघड फूट पडली आहे. दरम्यान, मनीष ब्रह्मभट्ट यांनी केलेल्या आरोपांवर अभिजीत दीपके किंवा अरविंद केजरीवाल यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!