Phone Pro घेण्याचा नाद नातवाला पडला महागात; आजोबांच्याच घरात केली चोरी, लाखोंचे दागिने लंपास


यवतमाळ : महागडा आयफोन 17 प्रो खरेदी करण्याची इच्छा होती, मात्र पैसे नसल्याने एका अल्पवयीन मुलाने धक्कादायक पाऊल उचलले. आपल्या मित्रांच्या मदतीने त्याने चक्क आजोबांच्या घरात चोरी करून तब्बल 6 लाख 72 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. यवतमाळमधील कनकवाडी परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे.

कनकवाडी येथील बंडू बोढाले यांच्या घरात 20 ते 21 ऑगस्टदरम्यान मध्यरात्री चोरी झाली होती. चोरट्याने घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून 52 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले होते. या दागिन्यांची किंमत सुमारे 6 लाख 72 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर बोढाले यांनी 1 सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच डीबी पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संविधान चौकातून गुणवंत उर्फ पोलार्ड पांडुरंग दानव (23, रा. विठ्ठलवाडी) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या चोरीचा उलगडा झाला.

पोलिसांच्या तपासानुसार, अल्पवयीन मुलाला महागडा ‘आयफोन प्रो’ खरेदी करायचा होता. मात्र त्याच्याकडे त्यासाठी पैसे नव्हते. त्याने ही इच्छा मित्र गुणवंत दानव आणि सुरज गेडाम (25) यांना सांगितली. त्यानंतर दोघांनी त्याला चुकीचा मार्ग दाखवत आजोबांच्या घरात चोरी करण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात समोर आले.

यानंतर अल्पवयीन मुलाने आजोबांच्या घरातील कपाटाचे लॉकर फोडून सोन्याचे दागिने चोरले. चोरी केल्यानंतर हे दागिने विकून पैसे मिळवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. त्यासाठी ते नागपूर किंवा चंद्रपूरच्या दिशेने जाण्याच्या तयारीत होते.

विक्री करण्यापूर्वीच पोलिसांनी आवळला फास

चोरीचे दागिने विकण्यापूर्वीच डीबी पथकाने कारवाई करत अल्पवयीन मुलासह गुणवंत दानव याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले संपूर्ण सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणातील सुरज गेडाम हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महागडा मोबाईल खरेदी करण्याच्या हव्यासापोटी अल्पवयीन मुलाने स्वतःच्या आजोबांच्याच घरात चोरी केल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!