मुंबईकर-पुणेकरांसाठी डबल गुड न्यूज! बुलेट ट्रेनचा वेग, २३८ एसी लोकल अन् ३५० विशेष गाड्यांची तयारी


मुंबई : मुंबई आणि पुणेकरांसाठी रेल्वे क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत महत्त्वाची घोषणा केली असून, या मार्गावरून प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे नियोजन आहे. मुंबई-पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने दोन्ही शहरांमधील दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे. मुंबईचा वडापाव आणि पुण्याची बाकरवडी खाण्यासाठी एका दिवसात सहज ये-जा करता येईल, अशा मिश्कील अंदाजात वैष्णव यांनी या प्रकल्पाचे महत्त्व सांगितले.

मुंबई-पुण्यासोबत पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे मार्गाचाही विकास करण्याची योजना आहे. पुणे-हैदराबाद प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील प्रवास, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना भविष्यात चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

गणेशोत्सवासाठीही रेल्वेने विशेष तयारी केली आहे. यंदा ३५० विशेष गाड्या चालवण्यात येणार असून, प्रवाशांची गर्दी वाढल्यास आणखी २० विशेष गाड्या सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरातील रेल्वे सुविधांसाठी तब्बल १८ हजार कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकलला मंजुरी देण्यात आली आहे. यातील पहिली एसी लोकल २०२७ मध्ये येण्याची शक्यता असून, २०३० पर्यंत सर्व नियोजित एसी लोकल सेवेत आणण्याचे लक्ष्य आहे. लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक सुविधा देण्यावरही भर दिला जाणार आहे.

मुंबईतील सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यासोबतच लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याचेही नियोजन आहे. सध्या सुमारे ३२०० लोकल फेऱ्या होत असून, त्या ३५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्यावरही रेल्वेचा भर राहणार आहे.

या घोषणांमुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होण्यासोबतच मुंबईकरांच्या दैनंदिन लोकल प्रवासातही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आता बुलेट ट्रेन प्रकल्पाची पुढील अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याच्या वेळापत्रकाकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!