स्मशानभूमीतील दाहिन्या बंद, नगरसेविकेचा संताप अनावर; ठेकेदाराला थेट ‘जिवंत जाळण्याची’ धमकी!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी विद्युत दाहिन्यांच्या देखभालीचा मुद्दा चांगलाच तापला. शहरातील काही स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिन्या बंद असल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी अडचणी येत असल्याचा मुद्दा भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी सभागृहात उपस्थित केला.
दाहिन्या नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आपण महापालिका आयुक्तांसह संबंधित विभागाकडे अनेकदा केल्या आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, अशी नाराजी मोरे यांनी व्यक्त केली. या कामाची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत संबंधित ठेकेदारांची नावे प्रशासनाने जाहीर करावीत, अशी मागणी केली.

समस्या तातडीने सोडवली नाही तर आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा देताना मोरे यांनी सभागृहात अत्यंत आक्रमक वक्तव्य केले. कामात सुधारणा न करणाऱ्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळण्याची धमकीच त्यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महापालिका राजकारणात एकच खळबळ उडाली असून, लोकप्रतिनिधींच्या भाषेवरूनही आता चर्चा सुरू झाली आहे.


विशेष म्हणजे, सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील नगरसेवकांनी यापूर्वीच सभात्याग केला होता. त्यामुळे मोरे यांनी हे वक्तव्य केले, त्यावेळी विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते. दुसरीकडे, या वादग्रस्त वक्तव्यावर सत्ताधारी भाजपकडून तत्काळ कोणतीही ठोस प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
विद्युत दाहिन्या हा नागरिकांच्या अंत्यविधीशी थेट संबंधित विषय असल्याने त्यांची दुरुस्ती आणि देखभाल वेळेत होणे गरजेचे आहे. ठेकेदारांच्या कामात हलगर्जीपणा असल्यास प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे आता लक्ष लागले आहे. मात्र, समस्या मांडताना वापरलेल्या आक्रमक शब्दांमुळे शैलजा मोरेंचे वक्तव्य हेच सध्या पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.