मोदींच्या ‘सोनं खरेदी करू नका’ आवाहनानंतर दर वाढले की घटले? आजचा सोने-चांदीचा भाव किती?

पुणे : महागाईमुळे कांदा आणि दूध महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढला आहे. अशातच सोने आणि चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज, ३ सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात झाली आहे.
जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही दिसून येत आहे. सोन्याच्या दरात सलग सहाव्या सत्रात घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याचा भाव किती घसरला?
आज ९९.९ टक्के शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २,१०० रुपयांची घसरण झाली आहे. १,५८,२०० रुपयांवर असलेला सोन्याचा भाव आता १,५६,१०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जवळपास तीन आठवड्यांतील ही सोन्याची नीचांकी पातळी आहे.


विशेष म्हणजे, गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल ११ हजार रुपयांची घसरण झाली आहे.
चांदीही झाली स्वस्त
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव ५ हजार रुपयांनी कमी होऊन २,३५,५०० रुपये प्रति किलो झाला आहे. मागील सत्रात चांदीचा भाव २,४०,५०० रुपये प्रति किलो होता.
मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात काय बदल?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना अत्यावश्यक नसल्यास सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर भर देण्याचे आवाहन करत त्यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीवर भर दिला.
मात्र, मोदींच्या या आवाहनानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली की घट, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या जागतिक बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचे दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही चढ-उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.५८ टक्क्यांनी वाढून ४,३०३.१२ डॉलर प्रति औंस झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात जवळपास १ टक्क्यांची घसरण झाली असून तो ६३.६४ डॉलर प्रति औंस झाला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही चांदीच्या दरात घसरण झाली असून भाव १,८४१ रुपयांनी कमी होऊन २,३३,६०० रुपये प्रति किलो झाला आहे.