‘आजपासून 58 लाख नोंदींवर प्रमाणपत्र द्या!’ जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम; ‘दंगल घडवायची असेल तर उपोषण सोडेन’ म्हणत संताप

आंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे सुरू असलेले उपोषण आता पाचव्या दिवशी पोहोचले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीतही सरकारकडून मागण्यांच्या अंमलबजावणीला ठोस सुरुवात झालेली नसल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट इशारा दिला आहे.
काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. मात्र, केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करा, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. विशेषतः मराठा समाजाच्या कुणबी नोंदींवरून प्रमाणपत्र वाटप तातडीने सुरू करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. ५८ लाख नोंदींचा मुद्दा यापूर्वीही जरांगे यांनी सरकारसमोर ठामपणे मांडला आहे.

‘आजपासूनच प्रमाणपत्र वाटप सुरू करा’


जरांगे पाटील यांनी सरकारकडे आजपासूनच जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्याची मागणी केली. ५८ लाख नोंदींच्या आधारे पात्र नागरिकांना प्रमाणपत्रे देण्यात यावीत, रद्द करण्यात आलेली चार प्रमाणपत्रे पुन्हा वैध करण्यात यावीत, तसेच सातारा आणि कोल्हापूर संस्थानांबाबतचे जीआर काढण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करावे आणि ईसीबीसीमधून निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ‘सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे’, असा आग्रह त्यांनी धरला.
‘आंदोलन मोडून काढायचं आहे का?’
सरकारने दिलेला मसुदा मान्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता जरांगे पाटील यांनी तो अद्याप वाचला नसल्याचे सांगितले. मात्र, प्रकृती खालावत असताना सरकारकडून निर्णय घेण्यास विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी केला.
सरकारकडून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या जातींना डाग लावण्याचा आणि आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘दंगल घडवायची असेल तर उपोषण सोडेन’
दरम्यान, जर आंदोलनाला दंगल किंवा हिंसाचाराचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला तर आपण उपोषण सोडून व्यासपीठावर बसू, असा इशारा जरांगे यांनी दिला. काही लोकांच्या डोक्यात दंगल घडवण्याचा कट असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मात्र, त्याचवेळी ‘आपण कुणालाही हात लावायचा नाही’ असे सांगत त्यांनी आंदोलकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. ‘मराठे चवताळले तर परिस्थिती गंभीर होईल’, असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील तणाव पुन्हा वाढला आहे. एकीकडे त्यांची प्रकृती चिंताजनक होत असताना दुसरीकडे सरकारसोबतच्या चर्चेची कोंडी कायम आहे. त्यामुळे सरकार ५८ लाख नोंदी, जात प्रमाणपत्रे, सातारा-कोल्हापूर संस्थानांचे जीआर आणि ईसीबीसी उमेदवारांच्या नियुक्त्यांबाबत तातडीने निर्णय घेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.