भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत फडणवीसांची पदाधिकाऱ्यांना तंबी; नेमकं काय घडलं?

पुणे : भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पक्षांतर्गत गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कामकाजावरून पदाधिकाऱ्यांना सुनावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरू असलेला वाद तसेच ‘स्पीकर’च्या मुद्द्यावरून भाजपमध्येच निर्माण झालेले मतभेद यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, विविध मोर्चांचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष तसेच माजी खासदार आणि माजी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पक्ष संघटनेला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रदेश कार्यकारणीची ही बैठक केवळ औपचारिक बैठक न राहता, पदाधिकाऱ्यांसाठी एकप्रकारची ‘कार्यशाळा’ ठरल्याची चर्चा आहे.


पुण्यातील नेत्यांची ‘स्वतंत्र शाळा’?
प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीसोबतच पुण्यातील स्थानिक भाजप नेत्यांसाठी फडणवीस यांनी स्वतंत्रपणे ‘शाळा’ घेतल्याची चर्चा अधिक रंगली आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना तुलनेने कमी मिळालेला प्रतिसाद, यावरून स्थानिक नेतृत्वाला फडणवीसांनी जाब विचारल्याची चर्चा आहे.
स्थानिक नेतृत्व प्रभावी करण्याचे निर्देश
भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनांना अपेक्षित गर्दी होत नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाल्याचे सांगितले जात आहे. संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी स्थानिक नेतृत्वाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.
टीकेला प्रभावी उत्तर देण्याची अपेक्षा
पुण्यातील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडून भाजपचे नेते आणि पक्षाच्या कामकाजावर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, त्याला पक्षाकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले जात नसल्याचा मुद्दाही फडणवीसांनी उपस्थित केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, पुण्यात भाजपच्या स्थानिक पातळीवर महापालिका, आमदार, खासदार आणि विविध नेत्यांचे स्वतंत्र गट निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. या अंतर्गत गटबाजीचा परिणाम पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावर होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्याचे बोलले जात आहे.