‘भुताटकी’च्या एका अफवेने ३०० विद्यार्थी शाळेबाहेर! मुलींच्या विचित्र वर्तनाने खळबळ, जिल्हाधिकारी रात्रभर मुक्कामी


अमरावती : मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळा सध्या ‘भुताटकी’च्या चर्चेमुळे राज्यभर चर्चेत आली आहे. विद्यार्थिनींच्या विचित्र वर्तनाच्या घटनांनंतर आश्रमशाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आतापर्यंत तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

या प्रकाराची सुरुवात २२ जुलैच्या रात्री झाली. आश्रमशाळेतील चार विद्यार्थिनी अचानक रडू लागल्या आणि किंचाळू लागल्या. काही वेळाने त्या मोठ्याने हसू लागल्याचेही सांगण्यात आले. तर काही मुली शांत बसून कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नसल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला घरापासून दूर राहणे, आई-वडिलांची आठवण किंवा मानसिक ताण यामुळे अशी प्रतिक्रिया आली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

मात्र काही दिवसांतच अशाच प्रकारचे वर्तन इतर विद्यार्थिनींमध्येही दिसू लागल्याने भीती आणखी वाढली. या प्रकाराला ‘मास हिस्टेरिया’सदृश प्रतिक्रिया असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान, गावात शाळेत भूत असल्याची अफवा वेगाने पसरली आणि पालकांनी आश्रमशाळेत धाव घेत विद्यार्थिनींना घरी नेण्यास सुरुवात केली.

मोहाच्या झाडापासून मंदिरापर्यंत अनेक दावे

भुताटकीच्या अफवेला स्थानिक अंधश्रद्धांमुळे आणखी खतपाणी मिळाले. आश्रमशाळेजवळील मोहाच्या झाडावर आत्मे असल्याचा स्थानिकांचा समज असल्याचे सांगितले जाते. हे झाड तोडल्यानंतरच विद्यार्थिनींना त्रास सुरू झाल्याचा दावा काही जण करत आहेत. दुसरीकडे, शाळेचे सांडपाणी मागील बाजूस असलेल्या स्थानिक देवतेच्या मंदिराकडे सोडले जाते आणि मंदिराच्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे देव नाराज झाल्याचीही चर्चा आहे.

याशिवाय शाळेजवळील शेतात एका आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचाच आत्मा विद्यार्थिनींना त्रास देत असल्याचा दावा काही स्थानिकांकडून केला जात आहे. मात्र या सर्व दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे विचित्र प्रकार ठराविक वयोगटातील विद्यार्थिनींमध्येच दिसून येत असल्याचे सांगितले जाते. त्यात विद्यार्थ्यांचा समावेश नसल्याने या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

डोमा आश्रमशाळेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिकपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. येथे २६३ मुले आणि ३४५ मुली शिक्षण घेत आहेत. मात्र अफवेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.

जिल्हाधिकारी स्वतः रात्रभर शाळेत

विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आश्रमशाळेतच रात्रभर मुक्काम केला. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता पुन्हा शाळेत यावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी नवीन आणि सुसज्ज इमारतीत वसतिगृह स्थलांतरित करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रबोधनात्मक उपक्रमही राबवण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करणारे सप्तखंजेरीवादक संदीप पाल महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. तरीही विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील भीती पूर्णपणे दूर झालेली नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेकडे केवळ भुताटकीच्या अफवेच्या दृष्टिकोनातून न पाहता विद्यार्थिनींच्या मानसिक स्थितीचा, आरोग्याचा आणि परिसरातील परिस्थितीचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर या घटनांमागील वास्तविक कारण काय आहे, याचा उलगडा होणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!