घराची दारं बंद, गच्चीवर मृतदेह! २२ वर्षीय इंजिनिअरच्या हत्येचं गूढ उकलण्यात ६० पोलिसांची धडपड

सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्याच्या गोडावडी गावात २२ वर्षीय संगणक अभियंता निधी पटेल हिची घरातच निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. २४ ऑगस्ट रोजी सकाळी तीर्थयात्रेवरून घरी परतलेल्या आई-वडिलांना गच्चीवर निधीचा मृतदेह आढळला. घटनेच्या वेळी ती घरात एकटी असल्याचे समोर आले आहे.
तपासात निधीचा गळा शॉर्ट्सच्या नाडी आणि मोबाईल चार्जरच्या केबलने आवळल्याचे समोर आले. तसेच तिच्या तोंडावर प्लास्टिकच्या दोन पिशव्या बांधण्यात आल्या होत्या. शरीरावरील काही खुणांमुळे लैंगिक अत्याचाराचा संशयही व्यक्त करण्यात आला असून, पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घराचा पुढील दरवाजा आतून बंद होता, तर मागील दरवाजा उघडा आढळला. घरात जबरदस्तीने घुसल्याच्या खुणा नसल्याने मारेकरी निधीच्या परिचयातील व्यक्ती असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. तिच्या अलीकडील हालचाली, संपर्कातील व्यक्ती आणि वैयक्तिक संबंधांची माहितीही गोळा केली जात आहे.


मांडवी पोलिसांकडून सुरुवातीला तपास सुरू होता; मात्र आरोपीचा ठोस माग काढण्यात यश न आल्याने सुरतचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली. मांडवीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षेश इंजिनिअर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ६० अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
SITकडून घटनास्थळावरील बोटांचे ठसे, निधीच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, संदेश आणि व्हॉट्सॲप चॅट्स तपासल्या जात आहेत. तिच्या मृत्यूपूर्वीच्या हालचालींचाही मागोवा घेतला जात आहे. SIT स्थापन होऊन चार दिवस झाले तरी अद्याप संशयित किंवा आरोपीपर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत. त्यामुळे निधीच्या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे आणि घरात प्रवेश करून हत्या कशी करण्यात आली, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान तपास पथकासमोर आहे.