‘प्रियंका गांधींवर सवाल, पण RSSमध्ये महिला कुठे?’; पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपला पलटवार

नाशिक : राहुल गांधींनी प्रियंका गांधींना नेतृत्वाची संधी का दिली नाही, या भाजपच्या टीकेला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट प्रत्युत्तर दिलं. महिलांना संधी देण्यावरून काँग्रेसला प्रश्न विचारणाऱ्या भाजपसमोर त्यांनी RSSच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलेला सरसंघचालक करणार का?” असा सवाल करत चव्हाण यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध असल्याचा दावा फेटाळताना चव्हाण यांनी २०२३मध्ये महिला आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक आणलं तेव्हा काँग्रेसने त्याला पाठिंबा दिल्याचं सांगितलं. महिला आरक्षणाचे जनक काँग्रेस असल्याचाही दावा त्यांनी केला.

नाशिकमध्ये काँग्रेसचं दहा दिवसांचं शिबिर सुरू असून, त्याच्या समारोपाला राहुल गांधी उपस्थित होते. त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळी कुंभमेळा, शक्तिपीठ मार्ग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह महाराष्ट्रातील विविध विषयांची माहिती राहुल गांधींना देण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.


दरम्यान, राज्यातील पेपरफुटीच्या घटनांवरूनही त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. पेपर कोट्यवधी रुपयांना विकले जात असल्याचा दावा करत दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पेपरफुटीला भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी केला.
नाशिककडे येताना राहुल गांधींना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागल्याचं सांगत चव्हाण यांनी राज्यातील रस्त्यांच्या स्थितीवरही टीका केली. कुंभमेळा प्रकल्पाचा अहवाल अद्याप आलेला नसल्याचं सांगत त्यांनी या प्रकल्पात ४०-४० टक्के कमिशन घेतल्याचा आरोप केला. शक्तिपीठ मार्गाच्या कामातही कमिशनखोरी झाल्याचा दावा त्यांनी केला.
एकीकडे भाजपकडून राहुल गांधींच्या महिला नेतृत्वाबाबत सवाल उपस्थित होत असताना, चव्हाण यांनी RSSच्या सर्वोच्च नेतृत्वात महिलांना संधी मिळणार का, हा मुद्दा पुढे आणला आहे. त्यामुळे महिला आरक्षणापासून पेपरफुटी आणि विकासकामांपर्यंतच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.