जरांगे पाटलांची प्रकृती खालावली अन् मराठा समाज रस्त्यावर! धुळे-सोलापूर महामार्ग रोखला; अंतरवालीत नेमकं काय घडलं?


जालना : मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीत प्रमाणपत्रे रद्द होत असल्याच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत त्यांचं उपोषण सुरू असून, उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. कालपासून त्यांना उलट्यांचा त्रासही सुरू झाला आहे.

जरांगे यांच्या प्रकृतीची माहिती समोर येताच अंतरवाली सराटीत मराठा समाजबांधवांमध्ये चिंता वाढली. उपोषणस्थळी मोठ्या संख्येने आंदोलक दाखल होत असून रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. रात्री १२ वाजेपर्यंत अंतरवालीतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एवढंच नाही, तर रात्री दीड वाजताही उपोषणस्थळी मराठा बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

प्रकृती खालावली आणि आंदोलकांचा पारा चढला

जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याचं समजताच मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी धुळे-सोलापूर महामार्गावर उतरून रास्ता रोको सुरू केला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत महामार्गावर ठिय्या दिला. काही आंदोलकांनी शेजारील शेतातून लाकडी ओंडके आणून रस्त्यावर टाकले, तर अनेक आंदोलक थेट महामार्गावर आडवे झाले. त्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

आंदोलकांना रस्ता मोकळा करण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सध्या ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं चित्र आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवला जाण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांशी संपर्क, पण जरांगेंची मागणी वेगळी

जरांगे पाटील यांच्याशी शासकीय अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. त्यांनी उपोषण सोडावं, अशी विनंती अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. सरकारच्या पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत, तसेच प्रशासकीय स्तरावर कोणते बदल झाले आहेत, याची माहितीही अधिकाऱ्यांनी जरांगे यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, केवळ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास जरांगे तयार नसल्याचं दिसत आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने स्वतः अंतरवाली सराटीत यावं आणि प्रत्यक्ष चर्चा करावी, अशी त्यांची मागणी कायम आहे. त्यामुळे एकीकडे त्यांची प्रकृती खालावत असताना दुसरीकडे सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीचा मुद्दा कायम असल्याने पेच वाढला आहे.

सरकारच्या हालचालींकडे लक्ष

जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यांनी उपचार नाकारल्याने समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्या प्रकृतीची स्थिती पाहून राज्यभरातील मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे येत आहेत. वाढती गर्दी, महामार्गावरील रास्ता रोको आणि सरकारच्या शिष्टमंडळाची अद्याप झालेली भेट या पार्श्वभूमीवर आंदोलनाला पुढे कोणतं वळण मिळतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याआधीच्या आंदोलनादरम्यानही महामार्ग रोखण्यात आला होता. त्यावेळी मनोज जरांगे यांनी फोनवरून आंदोलकांना समजावून रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं होतं. आता मात्र स्वतः जरांगे यांची प्रकृती खालावल्याने आंदोलकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. त्यामुळे सरकारकडून तातडीने काय पाऊल उचललं जातं आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत पुढील निर्णय काय होतो, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!