मोठी अपडेट! दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास आता CBIकडे; हायकोर्टाचा मोठा आदेश

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आज (२ सप्टेंबर २०२६) मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.
या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालयाने तपास CBIकडे सोपवण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या आदेशानंतर सतीश सालियन यांनी न्यायालयाचे आभार मानले.

तपासादरम्यान कोणालाही थेट आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, आधी संबंधितांचे जबाब नोंदवून सखोल तपास करावा आणि तपासातून निष्कर्ष समोर आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने दिल्याचे सांगण्यात आले आहे.


नेमकं प्रकरण काय?
दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांनी, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचे विविध दावे त्यावेळी करण्यात आले आणि हे प्रकरण चर्चेत आले.
दिशाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) नोंदवून तपास केला होता. पोलिसांच्या तपासात तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सतीश सालियन यांनी पोलिसांच्या या निष्कर्षावर प्रश्न उपस्थित करत मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणाचा नव्याने तपास करून एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली.
तपासावर न्यायालयाचे सवाल
याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने तपासाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करून तक्रार केली असताना एफआयआर का नोंदवण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला होता.
तसेच ADR आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या प्रती कुटुंबीयांना इतक्या वर्षांनंतरही का देण्यात आल्या नाहीत, याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते. चौदाव्या मजल्यावरून पडल्याचा पोलिसांचा दावा आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद झालेल्या दुखापती यांच्यातील सुसंगतीबाबतही न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते.
आदित्य ठाकरेंचा युक्तिवाद काय?
दरम्यान, दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसतानाही राजकीय हेतूने आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचा युक्तिवाद शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला होता.
सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सतीश सालियन यांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. आता न्यायालयाने तपास CBIकडे सोपवण्याचे निर्देश दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.