खवड्या डोंगरावरून उडी मारणाऱ्या कुणालच्या वडिलांबाबत मोठा खुलासा; MIDCमध्ये होते चालक, समोर आली महत्त्वाची माहिती


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथील खवड्या डोंगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका 19 वर्षीय तरुणाच्या आयफोनच्या हट्टावरून घरात झालेल्या वादानंतर एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मात्र, ही घटना केवळ आयफोनच्या कारणामुळेच घडली, असे सध्या निश्चितपणे म्हणता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेत कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचा मृत्यू झाला. कुणाल हा अभ्यासात हुशार होता. दहावीच्या परीक्षेत त्याने 92 टक्के गुण मिळवले होते. भविष्यात डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तो NEET परीक्षेची तयारी करत होता.

कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे हे MIDCमध्ये चालक म्हणून काम करत होते. मुलाच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी ते मेहनत घेत होते. कुणालच्या आयफोनच्या इच्छेसाठी त्यांनी पैशांची जुळवाजुळव करून फोन घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतर फोनच्या EMI आणि घरातील खर्चावरून वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी कुणाल तणावात असल्याचे सांगितले जात आहे. त्याला समजावून सांगण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलीस आणि त्याचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले होते. त्याला शांत करण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, या प्रयत्नांदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.

पोलिसांनी काय सांगितलं?

या प्रकरणाबाबत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. घटनेला अद्याप 24 तासही पूर्ण झालेले नसल्याने प्राथमिक तपासाच्या आधारावर केवळ आयफोनमुळेच ही घटना घडली, असे निश्चितपणे सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुणाल तणावात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले असून, त्याला समजावण्याचे प्रयत्न पोलीस आणि ग्रामस्थांनी केले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, नेमक्या कारणांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, एका कुटुंबाच्या आयुष्यावर या घटनेमुळे मोठे संकट कोसळले असून, या घटनेने पालक आणि मुलांमधील संवाद, आर्थिक ताणतणाव आणि मानसिक दबाव याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!