आधी विश्वास जिंकला, नंतर मोठा घात केला; पुण्यातील फसवणूक कांड समोर येताच महिलेला अटक

पुणे : पुण्यात शेअर मार्केट आणि फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग’ कंपनीच्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याचा आरोप असून, शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजश्री राजेश तुडयेकर (वय ४२, रा. बेळगाव) हिने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग’ नावाने कार्यालय सुरू केले होते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी तिने १ लाख रुपयांपासून तब्बल १०० कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवल्याचे समोर आले आहे.

मोठ्या परताव्याच्या आशेने अनेक गुंतवणूकदारांनी तिच्या कंपनीत पैसे गुंतवले. मात्र, गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर तक्रार दाखल होताच शिवाजीनगर पोलिसांनी तपासाला सुरुवात करून बेळगाव येथून आरोपी महिलेला ताब्यात घेतले.


दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ‘रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग’च्या माध्यमातून किंवा संबंधित महिलेच्या आमिषाला बळी पडून ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा अन्य गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.