शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवारांचा ‘प्लॅन’ काय? सलग बैठका, बड्या नेत्यांची हजेरी अन् राष्ट्रवादीत नव्या राजकीय हालचालींची चर्चा!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात सध्या हालचालींना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पार्थ पवार अचानक अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील प्रमुख नेते आणि मंत्र्यांच्या बैठका होत आहेत. विशेष म्हणजे, सलग बैठका होत असल्याने राष्ट्रवादीच्या पुढील राजकीय रणनीतीबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
दोन दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली होती. जवळपास तीन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती, केंद्रातील घडामोडी आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, बैठकीतील नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीनंतरच पार्थ पवार यांच्या राजकीय हालचालींना वेग आल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

शुक्रवारी रात्री पार्थ पवार यांच्या वरळी येथील निवासस्थानी काही प्रमुख मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ आणि इंद्रनील नाईक यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मंत्र्यांच्या खात्यांसमोरील अडचणी, राज्यातील विकासकामं आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


यानंतर आज पुन्हा पार्थ पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नवाब मलिक, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ आणि इंद्रनील नाईक यांसारखे नेते बैठकीला उपस्थित आहेत. मात्र, या बैठकीचा अधिकृत अजेंडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
या घडामोडींमध्ये पुण्यातील निधी वाटपाचा वाद हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी कापल्याचा आरोप असून, त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील स्थानिक पातळीवरील तणाव वाढल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांची सोमवारी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील निधीचा प्रश्न या बैठकीत निर्णायक ठरणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
एकीकडे शरद पवारांची भेट, त्यानंतर सलग दोन दिवस पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा आणि दुसरीकडे पुण्यातील निधी वाटपाचा वाद, या सगळ्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांच्या हालचालींना राजकीयदृष्ट्या महत्त्व आलं आहे. या बैठकांमधून राष्ट्रवादीची पुढील दिशा ठरणार का, पक्षांतर्गत काही मोठा निर्णय होणार का किंवा पुण्यातील वादावर तोडगा काढण्याची रणनीती आखली जात आहे का, याचं उत्तर आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.