सिंहगडावर जाणाऱ्यांनो आधी हे पाहा! एका वेळी इतक्याच पर्यटकांना मिळणार प्रवेश, नवा नियम लागू

पुणे : पावसाळा, शनिवार-रविवार आणि सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी सिंहगड किल्ल्यावर होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता वन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सिंहगडाच्या क्षमतेनुसारच पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षित क्षमता पूर्ण झाल्यानंतर पुढील पर्यटकांचा प्रवेश तात्पुरता बंद करण्यात येणार आहे.
AI आणि CCTVच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष
सिंहगडाची ‘कॅरिंग कॅपॅसिटी’ वैज्ञानिक पद्धतीने निश्चित करण्याचे काम सुरू आहे. गर्दीचे प्रभावी नियमन करण्यासाठी AI आधारित डिजिटल मॉनिटरिंग सिस्टीम आणि CCTV कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

पर्यटकांना घरबसल्या सिंहगडावरील गर्दीची स्थिती, पार्किंगची उपलब्धता आणि पर्यटनस्थळांची माहिती मिळावी यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲपही तयार करण्यात येत आहे. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांनी दिली.


नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई
सिंहगडावर अनुचित प्रकार रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे. वन विभाग आणि पोलिसांशी असहकार्य करणाऱ्या हुल्लडबाजांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाळ्यात सिंहगडावर दरडी कोसळणे, निसरडे रस्ते आणि चिखलामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक कड्यांवर जाणे टाळावे, कचरा करू नये आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. मद्यपान करून किल्ल्यावर प्रवेश करणे तसेच मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही मनाई करण्यात आली आहे.