पत्नीला मित्रासोबत बुलेटवर पाहिलं अन् पतीचा संताप! तिघांनी घेरून केली बेदम मारहाण; खिशातील १८ हजारही लंपास

पुणे : लोहगाव परिसरात पत्नीला तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून जाताना पाहिल्यानंतर विचारणा करणाऱ्या पतीला तिघांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाणीनंतर संबंधित व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशातून १८ हजार रुपयांची रोकड काढून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गणेश अशोक रेड्डी (वय ३५), राजूराव धोत्रे (वय ४६) आणि रेखा (वय ३५), तिघेही रा. बोपोडी, यांच्याविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भाडे सोडण्यासाठी खडकीहून एअरपोर्टच्या दिशेने जात होते. त्यावेळी फॉरेस्ट पार्क रोडवरील व्हॉनेटिव्ह सोसायटीजवळ त्यांना आपली पत्नी एका मित्रासोबत बुलेटवरून फिरताना दिसली. पत्नीला अशा प्रकारे पाहिल्यानंतर तक्रारदारांनी तिच्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र, यानंतर परिस्थिती अचानक चिघळली.

तक्रारीनुसार, गणेश रेड्डी, राजूराव धोत्रे आणि रेखा या तिघांनी संगनमत करून तक्रारदाराला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावर न थांबता रस्त्यावरील काठीनेही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यादरम्यान गणेश रेड्डी याने तक्रारदाराच्या पॅन्टच्या खिशातील १८ हजार रुपयांची रोकड काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


घटनेनंतर तक्रारदाराने लोहगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमागील नेमका वाद, तिघांची भूमिका आणि मारहाणीनंतर रोकड काढून घेण्यामागील उद्देश याचा तपास पोलीस करत आहेत. पत्नीला मित्रासोबत पाहिल्यानंतर सुरू झालेला वाद थेट मारहाण आणि रोकड लुटण्यापर्यंत पोहोचल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.