राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! ‘या’ भागांत मान्सून होणार सक्रिय; जाणून घ्या A टू Z माहिती


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र, आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत असून 13 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम राज्यातील पावसावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने 8 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 9 ते 12 ऑगस्टदरम्यान कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

जोरदार पावसामुळे काय धोका?

जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूरस्थिती निर्माण होणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. जुन्या किंवा कमकुवत संरचनांनाही धोका निर्माण होऊ शकतो. घाट परिसरात दरडी कोसळणे आणि भूस्खलनाचा धोका वाढू शकतो.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात राज्यात आतापर्यंत 637.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत राज्याची सरासरी 622.7 मिमी असून, आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 2 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

तळकोकणात पावसाची संततधार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांत पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1,608 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 30 टक्के तूट आहे.

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड पूर्ण केली आहे. तिलारी धरण 83.12 टक्के भरले असून धरणातून तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 15 छोटी-मोठी धरणे भरली असून काही धरणांच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये सध्या सुमारे 81 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!