‘साहेब, बिअर आणू का?’ वेटरचा एक प्रश्न अन् तुकाराम मुंढेंनी सोडलं हॉटेल; दिल्लीचा किस्सा ऐकून म्हणाल, ‘असंही घडलं होतं!’


पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची राज्यभर चर्चा सुरू आहे. भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी कारवाया सुरू असून, त्यांच्या कामाचे कौतुकही होत आहे. दरम्यान, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एका मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या आयुष्यातील तब्बल तीन दशकांपूर्वीचा एक रंजक किस्सा सांगितला. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये वेटरने विचारलेल्या अवघ्या एका प्रश्नामुळे त्यांनी हॉटेलमधील मुक्काम रद्द करून थेट महाराष्ट्र गाठला होता.

मुंढे यांनी सांगितले की, बीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी यूपीएससीच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या पुस्तकांच्या दुकानातून पुस्तके आणण्यासाठी त्यांच्या भावाने त्यांना दिल्लीला जाण्यास सांगितले. दोन-तीन दिवस दिल्लीत राहून अभ्यासाच्या दृष्टीने काही क्लासेसची माहिती घेता येईल, असा त्यामागचा उद्देश होता. १९९६-९७ च्या दरम्यानची ही घटना असून, त्यांचा तो पहिलाच रेल्वे प्रवास होता. छत्रपती संभाजीनगरहून मनमाड आणि तेथून दिल्ली असा प्रवास करून ते दिल्लीतील पहाडगंज परिसरात पोहोचले. रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला आणि फ्रेश झाल्यानंतर पुस्तकं घेण्यासाठी बाहेर गेले.

पुस्तकं घेऊन परतल्यानंतर त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) जाण्याचे नियोजन होते. मात्र, उशीर झाल्याने ते जेएनयूला जाऊ शकले नाहीत आणि पुन्हा हॉटेलवर परतले. याच वेळी हॉटेलमधील वेटरने त्यांना सहज विचारले, ‘साहेब, बिअर आणू का?’ वेटरचा हा प्रश्न ऐकताच मुंढे यांना संताप आला. आपल्याला दारू पिणारी व्यक्ती समजून वेटरने हा प्रश्न विचारला, असे त्यांना वाटले. त्यांनी वेटरला रागाने विचारले की, ‘तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही मला बिअरबद्दल का विचारलं?’ त्यावर वेटरनेही सहजपणे, ‘साहेब, बिअरच तर विचारली, दुसरं काय विचारलं?’ असे उत्तर दिले.

या प्रसंगानंतर मुंढेंनी त्या हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णयच बदलला. त्या दिवशी हॉटेलचे बुकिंग असतानाही त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला आपण येथे राहू शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तातडीने आपली बॅग भरली आणि हॉटेलमधून बाहेर पडले. त्या वेळी त्यांच्या मनात ‘आपल्याला बिअर कशी विचारू शकतात? अशा कल्चरमध्ये आपण अभ्यास कसा करायचा?’ असे विचार सुरू होते, असे त्यांनी सांगितले. अखेर दिल्लीमध्येच अभ्यास करण्याचा निर्णय त्यांनी सोडून दिला.

हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर मुंढे थेट रेल्वे स्थानकावर गेले आणि त्यांनी जनरल डब्याचे तिकीट काढले. दिल्लीहून ते भुसावळला आले. त्यानंतर भुसावळहून बसने जळगाव गाठले आणि जळगावहून थेट छत्रपती संभाजीनगरला परतले. यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेलेला त्यांचा हा प्रवास एका वेटरच्या साध्या प्रश्नामुळे अचानक संपला. आज प्रशासनातील कडक, शिस्तप्रिय आणि स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंनी स्वतः सांगितलेला हा जुना किस्सा त्यांच्या स्वभावाची वेगळीच बाजू समोर आणणारा ठरला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!