29 ऑगस्टला घरासमोर एकही गाडी ठेवू नका!; राज्यातील मराठ्यांना मनोज जरांगे पाटलांचं थेट आवाहन, सोलापुरातून कडाडले

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. तसेच आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे.
सोलापूर दौऱ्यात बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “आम्ही कुठेही इशारा सभा घेतलेल्या नाहीत. आम्ही फक्त गावखेड्यातील लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहोत आणि समाजाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.” आरक्षणाच्या प्रश्नामुळे केवळ गरीब मराठ्यांचेच नाही, तर भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या मराठा समाजाचेही नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला.

‘58 लाख नोंदी दिल्या’
जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर गंभीर आरोप केले. “मी समाजाच्या हितासाठी रक्त जाळून 58 लाख नोंदी दिल्या,” असा दावा त्यांनी केला. सरकारकडून गैरसमज पसरवले जात असून आरक्षणाच्या मुद्द्यावर कट रचला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.


काही कुणबी प्रमाणपत्रे आणि वैधता प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा दावा करत, यासंदर्भातील कागदपत्रे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन
दरम्यान, 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजाला आंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले.
“मराठ्यांनो, घर सोडायला शिका. 29 ऑगस्टला घरासमोर एकही गाडी राहू नये. राज्यातील सर्व मराठ्यांनी आंतरवालीत यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
तसेच सर्व राजकीय पक्षांमध्ये असलेल्या मराठा बांधवांनी आपली भूमिका चुकीची असल्यास सांगावी, असेही जरांगे पाटील म्हणाले. कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर त्यांनी काही व्यक्तींची उदाहरणे देत सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.