गावातल्या महिलांचे लपून फोटो काढायचा, AIच्या मदतीने स्वतःसोबत जोडायचा अन्… बीडच्या तरुणाचं धक्कादायक कांड


बीड : AI तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना त्याच्या गैरवापराच्या घटनाही समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील सारणी (सांगवी) येथे महिलांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय काढून AI ॲपच्या माध्यमातून त्यात फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारणी (सांगवी) गावातील महिला सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी येत असताना आरोपी त्यांचे मोबाईलमध्ये गुपचूप फोटो काढत असल्याचा आरोप आहे. गावातील महिला आणि मुलींचे फोटो परवानगीशिवाय घेऊन त्यांचा गैरवापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, काढलेले फोटो AI ॲपच्या मदतीने दुसऱ्या छायाचित्रांसोबत जोडून त्यांचा गैरवापर केला जात होता. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

तक्रार मिळताच केज पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलांचे फोटो परवानगीशिवाय काढणे, त्यात डिजिटल पद्धतीने फेरफार करणे आणि त्याचा गैरवापर करणे या आरोपांबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या घटनेनंतर AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी नागरिकांनी सोशल मीडिया अकाउंटवरील गोपनीयता सेटिंग्जकडे लक्ष देणे आणि अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक फोटो शेअर करणे टाळणे गरजेचे आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!