PK भेटीनंतर सुनेत्रा पवारांचा मोठा संदेश! ‘आदिवासी समाजच भारताला विकासाची दिशा दाखवणारा’, शिक्षण-रोजगारासाठी मोठी घोषणा


मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदिवासी समाजाच्या विकासाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. मुंबईत सुरू झालेल्या ‘आदिवासी संस्कृती उत्सव – वनरंग २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी आदिवासी समाजाला केवळ विकासाचा लाभार्थी नव्हे, तर देशाला विकासाची दिशा देणारा समाज असल्याचे ठामपणे सांगितले.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, जगभर ‘क्लायमेट चेंज’, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि ‘शाश्वत विकास’ यांसारख्या संकल्पनांवर चर्चा होत असताना आदिवासी समाज शेकडो वर्षांपासून निसर्गाशी सुसंवाद साधत जीवन जगत आला आहे. पर्यावरण संवर्धनाचा खरा आदर्श आदिवासी संस्कृतीत दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या जीवनपद्धतीतून आधुनिक समाजाने शिकण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य सरकार आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण तसेच रस्ता, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ दुर्गम भागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डिजिटल युगात आदिवासींच्या बोलीभाषा, लोककला, लोकसंगीत आणि हस्तकलेचे जतन करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे यांसारख्या आदिवासी वीरांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी आदिवासी समाजाचा इतिहास हा भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास असल्याचे अधोरेखित केले.

महायुती सरकारने आदिवासी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून आदिवासी भागांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळांचे आधुनिकीकरण, ई-लर्निंग सुविधा, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी विशेष योजना आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्रे उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी नाशिकच्या आदिवासी खेळाडू दिलीप गावित याने ग्लासगो येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून राज्याचा गौरव वाढवल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन अधिक सक्षम धोरण राबवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ७ ते ९ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘वनरंग २०२६’ महोत्सवात महाराष्ट्रातील भिल्ल, कोकणा, ठाकर आणि गोंड या प्रमुख जमातींच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी प्रदर्शने, देशभरातील आदिवासी हस्तकलेचे स्टॉल्स, वारली आणि गोंड चित्रकलेच्या कार्यशाळा, प्रेरणादायी मास्टरक्लास, आदिवासी खेळाडूंच्या अनुभवांचे सत्र तसेच पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे विशेष सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी परंपरा, कला आणि जीवनमूल्ये व्यापक समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून, त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!