पशुपालकांसाठी मोठी बातमी! राज्यात पशुधन विमा योजना लागू; जनावरांच्या मृत्यूवर मिळणार भरपाई


मुंबई : राज्यातील पशुपालकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना सुरू करण्यास प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत माहिती दिली.

नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा साथीच्या रोगांमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास पशुपालकांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवू नये, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

पूर, दुष्काळ, वादळ, वीज पडणे, वणवा, उष्णतेची लाट, भूकंप, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाणी, अपघात तसेच लम्पी स्कीनसारख्या साथीच्या रोगांमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. मात्र, जनावरांचे पूर्ण किंवा अंशतः अपंगत्व आणि वाहतुकीदरम्यान झालेले नुकसान विम्याच्या कक्षेत असणार नाही.

कोणत्या जनावरांना मिळणार विमा?

या योजनेत देशी व संकरित दुधाळ गायी, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्यांचा समावेश करण्यात आला आहे. एका कुटुंबाला जास्तीत जास्त 10 पशुधन घटकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे.

विम्याची कमाल रक्कम पुढीलप्रमाणे असेल:

दुभती गाय – 70 हजार रुपये
म्हैस – 80 हजार रुपये
बैल – 70 हजार रुपये
रेडा – 80 हजार रुपये
शेळी/मेंढी – 7 हजार रुपये

लाभार्थी आपल्या गरजेनुसार 1, 2 किंवा 3 वर्षांचा विमा घेऊ शकतात. प्रीमियमचा दर अनुक्रमे 4.30 टक्के, 7.50 टक्के आणि 10.50 टक्के असेल. यातील 85 टक्के प्रीमियम केंद्र आणि राज्य सरकारकडून 60:40 प्रमाणात अनुदान म्हणून दिला जाणार असून, उर्वरित 15 टक्के हिस्सा लाभार्थ्याला भरावा लागेल.

विम्याची रक्कम कधी मिळणार?

पशुधनाचा मृत्यू झाल्यास संबंधित घटनेची माहिती विमा कंपनीला 24 तासांच्या आत देणे आवश्यक असेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल करावा लागेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी जनावराची राष्ट्रीय डिजिटल पशुधन प्रणालीवर 12 अंकी इअर टॅगद्वारे नोंदणी आणि शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर विमा कंपनीने 15 दिवसांच्या आत आधार संलग्न बँक खात्यात DBTद्वारे विम्याची रक्कम जमा करणे बंधनकारक असेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!