पंचायत समितीत पराभव… तरीही मोठी राजकीय झेप! निर्मला नवले राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा युवा नेतृत्वावर मोठा विश्वास


पुणे : नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत अवघ्या १९३ मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या निर्मला नवले यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने मोठी राजकीय संधी देत पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. निवडणुकीतील निकालानंतर त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच पक्षाने हा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. युवा नेतृत्वाला पुढे आणण्याच्या रणनीतीचा हा महत्त्वाचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले या व्यवसायाने आयटी इंजिनिअर आहेत. ग्रामविकासातील कामे, आधुनिक विचारसरणी आणि डिजिटल माध्यमांवरील प्रभावी उपस्थितीमुळे त्यांनी अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर त्यांच्या पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असल्याने ग्रामीण भागातील लोकप्रिय महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता याच लोकप्रियतेचा आणि जनसंपर्काचा फायदा पक्षाला संघटन विस्तारासाठी करून घेण्याची तयारी सुरू असल्याचे मानले जात आहे.

युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर महिला आणि युवती कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे, नव्या पिढीला राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडणे, जिल्हानिहाय संघटन उभारणे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवणे, या प्रमुख जबाबदाऱ्या नवले यांच्यावर असणार आहेत. त्यामुळे ही केवळ पदनियुक्ती नसून पक्षाच्या भविष्यातील संघटनात्मक रणनीतीतील महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

दरम्यान, कारेगाव पंचायत समिती गणातून अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून लढलेल्या निवडणुकीत निर्मला नवले यांना ६,५०० मते मिळाली होती. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी ६,६९३ मते मिळवत १९३ मतांच्या फरकाने विजय मिळवला. या पराभवानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पक्षाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून नेतृत्वावरील विश्वास कायम असल्याचा स्पष्ट संदेश दिला.

निर्मला नवले यांचे नाव यापूर्वी त्यांच्या रेंज रोव्हर कारच्या व्हायरल व्हिडिओमुळे देशभर चर्चेत आले होते. “मला जे हवं असतं ते मला मिळायलाच हवं,” असे म्हणत त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळवले होते. या व्हिडिओनंतर त्यांच्या जीवनशैलीवरून मोठी चर्चा रंगली होती. समर्थकांनी त्यांचे कौतुक केले, तर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.

पराभवाच्या छायेतून थेट प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा निर्मला नवले यांचा प्रवास सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची युवती संघटना कितपत प्रभावी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!