ST कर्मचाऱ्यांना इशारा! ड्युटीवर रील्स बनवणं पडणार महाग; महामंडळाची नवी आचारसंहिता लागू

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या आचारसंहितेनुसार, ड्युटीवर असताना किंवा गणवेशात रील्स, शॉर्ट्स, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ तयार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आगार, बसस्थानक, कार्यालय तसेच एसटी बसमध्ये गणवेशात व्हिडिओ तयार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

‘या’ नियमांचे पालन बंधनकारक
ड्युटीवर असताना, विशेषतः वाहन चालवताना रील्स, शॉर्ट्स किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास सक्त मनाई.
आगार, बसस्थानक, कार्यालय आणि एसटी बसमध्ये गणवेशात कोणतेही व्हिडिओ तयार करता येणार नाहीत.
एसटी महामंडळाची गोपनीय माहिती, छायाचित्रे किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास बंदी.
कोणत्याही सकारात्मक उपक्रमाचा व्हिडिओ तयार करायचा असल्यास संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक.
नियम मोडल्यास कडक कारवाई


नवीन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रथम ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली जाईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन
सोशल मीडियावर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही. महामंडळाच्या अधिकृत माहितीचा, प्रवासी सुविधा, लोककल्याणकारी योजना, स्वच्छता अभियान, रस्ते सुरक्षा आणि इतर सकारात्मक उपक्रमांचा प्रचार-प्रसार करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
याशिवाय, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या इन्फ्लुएन्सर कर्मचाऱ्यांनाही अटी व शर्तींच्या अधीन राहून जनहिताच्या मोहिमा आणि महामंडळाच्या उपक्रमांचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.